‘गाव विकायला काढलं’ अन् सरकार हललं! तुळशीच्या दुष्काळावर मोठा निर्णय; जानेवारीपर्यंत पाण्याचा मार्ग मोकळा होणार
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गावाने तीव्र दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे गाव विक्रीला काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशासन आणि राज्य सरकारने या प्रश्नाची गंभीर दखल घेतली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गावाला भेट देत पिण्याच्या पाण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांची योजना, सीना-माढा योजनेत परिसरातील गावांचा समावेश आणि तुळशी परिसरासाठी स्वतंत्र 22 कोटी रुपयांचे टेंडर काढण्याचे आश्वासन दिले आहे.

सोलापूर : कायमस्वरूपी दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाईमुळे थेट गाव विक्रीला काढण्याचा निर्णय घेतलेल्या माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी तुळशी गावाला भेट देत जानेवारीपर्यंत पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
तुळशी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या ग्रामसभेत बोलताना गोरे यांनी आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित कामांना तातडीने सुरुवात केली जाईल, असे स्पष्ट केले. या घोषणेनंतर ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.
पिण्याच्या पाण्यासाठी साडेतीन कोटींची योजना
गेल्या काही महिन्यांपासून पाणीप्रश्नासाठी ग्रामस्थांनी विविध आंदोलने केली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सप्टेंबरअखेरीस गाव विक्रीला काढल्याचे फलक लावण्यात आले. या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाल्यानंतर प्रशासन आणि सरकारने या प्रश्नाची दखल घेतली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पहिल्या टप्प्यात तुळशी गावातील पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची योजना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे.
सीना-माढा योजनेत सात ते आठ गावांचा समावेश
तुळशीसह परिसरातील सात ते आठ कायम दुष्काळी गावांचा सीना-माढा उपसा सिंचन योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही गोरे यांनी सांगितले. यासाठी आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण करून जानेवारीपर्यंत पुढील मार्ग मोकळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आचारसंहितेमुळे सध्या प्रत्यक्ष काम सुरू करता येत नसले, तरी आचारसंहिता संपताच कामांना गती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तुळशी परिसरासाठी स्वतंत्र 22 कोटींचे टेंडर
सीना-माढा योजनेचा एकूण खर्च सुमारे 976 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तुळशी आणि परिसरातील दुष्काळग्रस्त गावांना लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी स्वतंत्र 22 कोटी रुपयांचे टेंडर काढून कामाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तुळशी गावाच्या पाणीप्रश्नाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले.
35 ते 40 वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष
माढा तालुक्यातील तुळशी गावात गेल्या 35 ते 40 वर्षांपासून पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ग्रामस्थांना अनेकदा टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी गावाला मिळावे, अशी सातत्याने मागणी केली होती.
पाणीप्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर ‘गाव विकणे आहे’ असे फलक लावत अनोखे आंदोलन केले होते. आता पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तुळशी आणि परिसरातील गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची आशा ग्रामस्थांना आहे.