सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंड तापलं; सुनेत्रा पवारांच्या आव्हानाला पुरुषोत्तम जगतापांचे प्रत्युत्तर

बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ रिंगणात उतरवणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या आव्हानाला उत्तर देताना, “अजितदादा सभासदांच्या मनात आणि आमच्या हृदयात आहेत. त्यांचे नाव मी वापरणारच,” असे म्हटले आहे. निवडणुकीत आता तीन पॅनेल आणि 83 उमेदवार रिंगणात आहेत.

sunetra-pawar

बारामती : बारामती तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरी आणि त्याला मिळालेला भाजपचा पाठिंबा यामुळे यंदाची निवडणूक अधिक चुरशीची बनली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडाचे निशाण उभारणारे पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या पॅनेलच्या नावात अजित पवार यांच्या नावाचा वापर करण्यात आल्याने राष्ट्रवादीकडून आक्षेप घेण्यात आला होता.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पुरुषोत्तम जगताप यांना अजित पवारांचे नाव न वापरता स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले होते. या आव्हानाला आता जगताप यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे.

‘अजितदादा आमच्या हृदयात’

माध्यमांशी बोलताना पुरुषोत्तम जगताप म्हणाले, “कारखान्याच्या विकासासाठी आणि सभासदांच्या हितासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत. अजितदादांची गणना महापुरुषांमध्ये केली जाते. त्यामुळे मी अजित पवारांचे नाव वापरणारच. सुनेत्राताई अजितदादांना सभासदांच्या मनातून आणि आमच्या हृदयातून कसे बाहेर काढणार?”

त्यांच्या या वक्तव्यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीतील राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

अजित पवारांचा फ्लेक्स हटवला

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्या लेटरहेडवर एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. अजित पवार यांच्या नावाचा किंवा छायाचित्राचा वापर करण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांची रीतसर परवानगी घ्यावी, असे आवाहन या पत्रकातून करण्यात आले होते.

यानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी वानेवाडी येथील प्रचार मेळाव्यात लावण्यात आलेला अजित पवारांचा फ्लेक्स हटवला.

फोटो हटवल्यानंतर जगताप म्हणाले, “अजितदादा सभासदांच्या मनात आणि आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो लावला किंवा नाही लावला, तरी काही फरक पडत नाही.”

83 उमेदवार निवडणूक रिंगणात

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सुरुवातीला एकूण 601 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर 514 अर्ज पात्र ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या 30 सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत तब्बल 431 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात 83 उमेदवार उरले आहेत.

या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल, युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनेल आणि भाजपच्या पाठिंब्याने पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ अशी तीन प्रमुख पॅनेल आमनेसामने आहेत.

तीनही पॅनेलने विजयाचा दावा केला असून, राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडखोरी आणि अजित पवारांच्या नावावरून सुरू झालेल्या राजकीय संघर्षामुळे सोमेश्वर कारखान्याची ही निवडणूक बारामतीच्या राजकारणासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरण्याची शक्यता आहे.

Inline Article Ad 728x90