सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची हायकोर्टात दखल; वैद्यकीय उपचारांची मागणी

दिल्लीतील जंतर-मंतरवर 18 दिवसांपासून उपोषण करणारे सोनम वांगचुक यांच्या आरोग्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले असून तातडीच्या वैद्यकीय उपचारांची मागणी करण्यात आली आहे.

सोनम वांगचुक Image

दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या 18 दिवसांपासून उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आरोग्याच्या स्थितीबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय तपासणी, आवश्यक उपचार, जीवनरक्षक सुविधा आणि योग्य पोषण उपलब्ध करून देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारकडून उत्तर मागितले असून गुरुवारी सकाळपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, बार असोसिएशनच्या बहिष्कारामुळे सरकारच्या बाजूने कोणताही वकील न्यायालयात उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे पुढील सुनावणी लांबणीवर पडली.

याचिकाकर्ते राकेश कुमार सैनी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाला माहिती दिली की, सोनम वांगचुक हे अनेक दिवसांपासून उपोषण करत असून त्याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यांची प्रकृती आणखी खालावण्यापूर्वी त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

सोनम वांगचुक यांनी नीट पेपरफुटी, परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीसाठी 28 जूनपासून जंतर-मंतर येथे उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.

आता त्यांच्या आरोग्याच्या मुद्द्यावर दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Inline Article Ad 728x90