व्हिएतनाममध्ये भीषण बोट दुर्घटना; फु कोक बेटाजवळ स्पीडबोट उलटून १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू

व्हिएतनामच्या फु कोक बेटाजवळ स्पीडबोट उलटून १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला असून २१ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. भारतीय दूतावासाने मदत केंद्र सुरू केले आहे.

बोट Image

११ जुलै : व्हिएतनाममधील लोकप्रिय पर्यटनस्थळ फु कोक (Phu Quoc) बेटाजवळ शनिवारी भीषण बोट दुर्घटना घडली. समुद्रात पर्यटनासाठी गेलेली स्पीडबोट परतीच्या प्रवासात मोठ्या लाटा आणि जोरदार वाऱ्यामुळे उलटल्याने १५ भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे भारतासह व्हिएतनाममध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पीडबोटमध्ये ३२ भारतीय पर्यटक आणि ४ स्थानिक क्रू सदस्य असे एकूण ३६ जण प्रवास करत होते. 'हॉन मे रुत' बेटावरून परतत असताना किनाऱ्यापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर बोट अचानक उलटली. अपघाताची माहिती मिळताच व्हिएतनामच्या बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

या दुर्घटनेत १३ पुरुष आणि २ महिलांसह एकूण १५ भारतीयांचा मृत्यू झाला. तर २१ जणांना समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, मृत आणि जखमी पर्यटकांमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू येथील नागरिकांचा समावेश आहे. मृतांमध्ये आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम येथील गेल्ली जयलक्ष्मी आणि कडप्पा येथील मुदियम श्रीधत यांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पर्यटकांपैकी काही जण एका मोबाईल कंपनीशी संबंधित असल्याचेही सांगितले जात आहे.

दुर्घटनेनंतर व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने तातडीने आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू केला असून, पीडितांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे आणि आवश्यक ती सर्व मदत करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, व्हिएतनाम सरकारने या दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास सुरू केला असून, समुद्री पर्यटनाच्या सुरक्षेच्या नियमांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Inline Article Ad 728x90