गिरीजा राऊतच्या धक्कादायक आरोपांनी खळबळ; विनायक राऊतांच्या संपूर्ण कुटुंबावर ठाण्यात गुन्हा
विनायक राऊत, गितेश राऊत आणि कुटुंबावर ठाण्यात कौटुंबिक छळ, जादूटोणा आणि गोमूत्र पाजणे, केस कापणे अशा गंभीर आरोपांवरून गुन्हा दाखल झाला आहे. गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सात जणांविरोधात कारवाई केली असून फिरोज शेखला अटक करण्यात आली आहे; मात्र विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा तथा नगरसेवक गितेश राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारीत कौटुंबिक छळ, मानसिक आणि शारीरिक त्रास, तसेच महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गिरीजा राऊत यांनी घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिल्याचा, डोक्यावरील केस कापल्याचा आणि अघोरी प्रकार चा दावा केला आहे.
विनायक राऊत कुटुंबावर ठाण्यात गुन्हा दाखल
ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच ‘जादूटोणा विरोधी कायद्याअन्वये’ गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
सूनेचे अत्यंत गंभीर आरोप
माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत राऊत कुटुंबावर अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत कुटुंबाकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिले गेले, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय, राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेने तिच्या डोक्यावरील केस कापल्याचा आरोपही गिरीजा यांनी तक्रारीत केला आहे.
फिरोज बाबा, काजी बाबा यांच्यावरही गुन्हा
या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणात राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काजी बाबाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. गितेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, प्रत्येक बाबतीत खोटं बोलून विश्वासघात केला, असा आरोप गिरीजा राऊत यांनी केला.
विनायक राऊतांचे स्पष्टीकरण
आता सून गिरीजा राऊत यांच्या आरोपावर विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून स्पष्टीकरण दिले. मी आणि माझ्या कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे आहेत, असं त्यांनी म्हटलं. गेल्या तीन वर्षांपासून गितेश आणि गिरीजा एकत्र राहत नाहीत. 2018 मध्ये घटना घडली असे सांगते आणि 2026 मध्ये त्याची तक्रार करत आहेत. यात काहीतरी काळं आहे, असंही ते म्हणाले.
आर्थिक मागण्यांचा दावा
विनायक राऊत यांनी असा दावा केला की, या नोटिशीमध्ये दर महिन्याला खर्चासाठी 5 लाख द्यावे, अशी मागणी गिरीजा राऊत यांनी केली होती. याशिवाय 10 कोटींची अधिक रक्कम द्यावी, मानसिक नुकसानभरपाई म्हणून 2 कोटी द्यावेत, तसेच 5 रूमचं घर आणि ऑटोमॅटीक गाडी मागितली होती. या मागण्या पूर्ण होत नाहीत, म्हणून तिने तक्रार केली, असा दावा त्यांनी केला.
अघोरी उपचारांचे आरोप फेटाळले
आम्ही अघोरी उपचारांच्या आरोपांचे पूर्ण खंडन करतो. आम्ही त्या पंथातले नाही, असं विनायक राऊत म्हणाले. आई-वडील समोर असताना तिने तेव्हा तक्रार केली नाही. या संदर्भात आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पोलिसांची कारवाई
राऊत कुटुंबीयांकडून प्रतिसाद न मिळाल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भोंदू बाबा फिरोज शेखला कापूरबावडी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. त्याला थोड्याच वेळात ठाणे कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.