उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद जाणार? हायकोर्टाचा मोठा निर्णय

दादरच्या वॉर्ड क्रमांक 191 मधून विजयी झालेल्या ठाकरे गटाच्या विशाखा राऊत यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती; मात्र हायकोर्टाने याचिका फेटाळल्याने त्यांच्या नगरसेवकपदावर गंडांतर आलं आहे. विशेष म्हणजे, राऊत यांचं पद रद्द झाल्यास निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या प्रिया सरवणकर गुरव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Vishakha Raut

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दादरमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या वॉर्ड क्रमांक 191 मधून विजयी झालेल्या विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राबाबत जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने आता त्यांच्या नगरसेवकपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

विशाखा राऊत यांनी दादरच्या वॉर्ड क्रमांक 191 मधून निवडणूक लढवत शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर गुरव यांचा पराभव केला होता. त्यामुळे राऊत यांचा विजय हा ठाकरे गटासाठी महत्त्वाचा मानला गेला होता. मात्र, जात प्रमाणपत्राच्या वादामुळे आता त्यांच्याच नगरसेवकपदावर गदा आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

विशाखा राऊत यांचं ओबीसी अर्थात कुणबी जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय पालघर जात पडताळणी समितीने दिला होता. या निर्णयानंतर राऊत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, मुंबई महापालिकेनेही त्यांचं नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा करण्यासाठी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला होता.

महापालिकेच्या या भूमिकेलाच राऊत यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र, हायकोर्टाने याचिका फेटाळल्याने आता पुढे काय होणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

महापालिका आयुक्तांचं सरकारला पत्र

मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी 25 ऑगस्ट रोजी राज्याच्या नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. 20 ऑगस्ट रोजी जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय झाल्यानंतर महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार राऊत यांची नगरसेवक म्हणून झालेली निवड रद्द झाल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

इतकंच नाही, तर नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर पुढील सहा वर्षे नगरसेवकपदाची निवडणूक लढवण्यास त्या अपात्र ठरतील, असंही पत्रातून स्पष्ट करण्यात आलं आहे. ही बाब महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

आता प्रिया सरवणकर गुरव यांना संधी?

विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झाल्यास निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या प्रिया सरवणकर गुरव यांना नगरसेवकपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. राऊत यांचं पद रद्द करण्याची मागणी करत माजी आमदार सदा सरवणकर यांनी महापालिका आयुक्तांची भेटही घेतली होती.

मात्र, जात प्रमाणपत्राच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विशाखा राऊत यांच्याकडे 90 दिवसांचा अवधी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पुढील कायदेशीर प्रक्रिया काय वळण घेते, आणि अखेर दादरच्या वॉर्ड क्रमांक 191 मध्ये नगरसेवक म्हणून कोण राहणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Inline Article Ad 728x90