अजितदादा होते तेव्हा विषय वेगळा, आता खुद्द पवार साहेब मैदानात; युगेंद्र पवारांनी दंड थोपटले, सोमेश्वरच्या निवडणुकीला रंग!

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’च्या प्रचाराचा शुभारंभ करताना युगेंद्र पवारांनी शरद पवार आता स्वतः या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे सांगितले. कारखान्यात पारदर्शक कारभार, मेरिटवर भरती आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

yugendra-pawar

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या निवडणुकीत पवार कुटुंबाच्या राजकारणाचा प्रभाव स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. श्री सोमेश्वर मंदिरात युवा नेते युगेंद्र पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना युगेंद्र पवार यांनी थेट शरद पवार यांच्या भूमिकेचा उल्लेख करत निवडणुकीला नवा राजकीय रंग दिला. “अजितदादा होते तोपर्यंत गोष्ट वेगळी होती. साहेबांनी सांगितले की, अजित होता तोपर्यंत मी खाली लक्ष घालत नव्हतो. मात्र आता मी स्वतः या कारखान्याच्या विषयात लक्ष घालणार आहे,” असे युगेंद्र पवार म्हणाले.

‘कारखाना सभासदांचाच राहिला पाहिजे’

युगेंद्र पवार म्हणाले की, “दुर्दैवाने आता अजित आपल्यात राहिले नाहीत. हा कारखाना सभासदांचा आहे आणि तो सभासदांचाच राहिला पाहिजे, यासाठी मी यात लक्ष घालणार आहे, असे साहेबांनी सांगितले आहे.”

आपण 80 हून अधिक गावांचे दौरे केले असून, अनेक ठिकाणी नागरिक आणि सभासदांकडून शरद पवार यांच्या नेतृत्वाला पसंती मिळत असल्याचा दावाही युगेंद्र पवार यांनी केला.

“आम्ही सर्व उमेदवार देऊन पूर्ण पॅनल उभे केले आहे. आमचे उमेदवार सामान्य कुटुंबांतील आहेत. मोठ्या गाड्या किंवा 5555 सारखे नंबर त्यांच्याकडे दिसणार नाहीत. मात्र काही उमेदवार उच्चशिक्षित असून कारखान्याचा कारभार सक्षमपणे सांभाळण्याची क्षमता त्यांच्यात आहे,” असेही त्यांनी सांगितले.

महिलांना अधिक प्रतिनिधित्व दिल्याचा दावा

सोमेश्वर शेतकरी विकास पॅनलमध्ये तीन महिला उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले. विरोधी पॅनलने दोनच महिलांना उमेदवारी दिल्याचा उल्लेख करत त्यांनी आपल्या पॅनलने महिलांच्या प्रतिनिधित्वाला अधिक महत्त्व दिल्याचा दावा केला.

“साहेब नेहमी महिलांना प्रोत्साहन देण्याचा आग्रह धरतात. त्याच भूमिकेतून आम्ही तीन महिलांना उमेदवारी दिली आहे,” असे युगेंद्र पवार म्हणाले.

प्रचारसभेदरम्यान एका कार्यकर्त्याने “दादा, लव्ह यू” अशी हाक मारल्यानंतर युगेंद्र पवार यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. “मी तुम्हाला लव्ह यू टू म्हणालो असतो, पण अलीकडच्या काळात हे जरा जास्त झालं आहे,” असे ते म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

‘तेच तेच चेहरे नको, नव्या गावांना संधी’

गरदडवाडी गावाला पहिल्यांदाच संचालक पदासाठी संधी दिल्याचेही युगेंद्र पवार यांनी सांगितले. काही गावांमध्ये अनेक वर्षे एकाच व्यक्तींना संधी मिळत असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी नव्या गावांना आणि नव्या चेहऱ्यांना प्रतिनिधित्व देण्यावर भर दिला.

“कारखान्यातून अनेक उपपदार्थ तयार होऊ शकतात. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळवून सभासदांना अधिक दर देता येऊ शकतो. त्यासाठी आधुनिक पद्धतीने कारखाना चालवणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.

‘कामगारांची भरती वशिल्यावर नव्हे, मेरिटवर’

कारखान्याच्या कामकाजात पारदर्शकता असली पाहिजे, अशी भूमिका युगेंद्र पवार यांनी मांडली. “कारखाना चांगला चालवायचा असेल तर कामगारांची निवड मेरिटवर झाली पाहिजे, वशिल्यावर नाही,” असे ते म्हणाले.

शरद पवार सत्तेत नसले तरी त्यांचे राजकीय वजन आणि अनुभव मोठा असल्याचा उल्लेख करत ते म्हणाले, “काही लोक म्हणतात की आता साहेबांची सत्ता नाही. पण साहेब एवढे मोठे नेते आहेत की सत्ता असो वा नसो, आपली कामे होऊ शकतात.”

‘आठवड्यातील एक दिवस कारखान्यासाठी देईन’

आपले पॅनल निवडून आल्यास आठवड्यातील एक दिवस आपण स्वतः कारखान्याच्या कामासाठी देऊ, अशी घोषणाही युगेंद्र पवार यांनी केली.

“मी इथे बसून कारखान्याचा कारभार पाहीन. गरज पडल्यास साहेबांचे मार्गदर्शन घेईन. हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून दाखवू. फक्त सभासदांनी आम्हाला साथ द्यावी,” असे ते म्हणाले.

विरोधकांकडून वैयक्तिक टीका किंवा चिखलफेक झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. “दुसऱ्याला शिव्या देऊन कोणी मोठे होत नाही. सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून प्रचार करा,” असे त्यांनी सांगितले.

‘भाजप मागच्या दाराने येण्याचा प्रयत्न करतोय’

बारामतीत भाजप मागच्या दाराने प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही युगेंद्र पवार यांनी केला. सभासदांनी याबाबत सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

“किटली हे आपल्या पॅनलचे चिन्ह आहे आणि किटलीशिवाय कपबशी भरत नाही. दुसरे चिन्ह शिट्टी आहे आणि शिट्टी सावध करण्यासाठी वाजवली जाते. त्यामुळे सभासदांना सावध करा,” अशा शब्दांत युगेंद्र पवार यांनी प्रचाराचा सूर अधिक आक्रमक केला.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. शरद पवार स्वतः या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याच्या युगेंद्र पवार यांच्या वक्तव्यामुळे आता या लढतीकडे संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Inline Article Ad 728x90