पुणे-संभाजीनगर प्रवास फक्त 2 तासांत? गडकरींची मोठी घोषणा; 60 हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पांचा मास्टरप्लॅन
पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर मात करण्यासाठी पुढील दोन वर्षांत सुमारे 60 हजार कोटी रुपयांच्या विविध रस्ते प्रकल्पांवर काम केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पुणे-छत्रपती संभाजीनगर प्रवास दोन तासांत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, पुढे नागपूरपर्यंतचा प्रवासही अधिक वेगवान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आता शहर आणि आसपासच्या परिसरासाठी मोठ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात पुढील दोन वर्षांत तब्बल 60 हजार कोटी रुपयांच्या विविध रस्ते प्रकल्पांवर काम होणार असल्याचे सांगितले. मात्र, या घोषणांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते पुणे ते छत्रपती संभाजीनगरचा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण करण्याच्या त्यांच्या लक्ष्याने.
पुणे-छत्रपती संभाजीनगरदरम्यान सहापदरी महामार्ग विकसित केला जात असून, या मार्गामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. पुढे हा मार्ग नागपूरशी जोडला जाणार असून पुण्याहून नागपूरकडे जाण्यासाठी विमानाची गरज भासणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले.
पुण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी विविध मार्गांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार आहे. यामध्ये शिरूर-पुणे प्रकल्पासाठी 31,600 कोटी रुपये, हडपसर-यावत मार्गासाठी 5,265 कोटी रुपये, तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गासाठी 4 हजार कोटी रुपये आणि शिरूर-छत्रपती संभाजीनगर मार्गासाठी 15 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
याशिवाय खेड-नाशिक फाटा मार्गासाठी 8 हजार कोटी, रावेत-नऱ्हे मार्गासाठी 6 हजार कोटी आणि पुणे-सोलापूर मार्गासाठी 8 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
दरम्यान, मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठीही नव्या रस्ते प्रकल्पांवर भर दिला जात आहे. पूर्वी मुंबई-पुणे प्रवासासाठी सहा ते सात तास लागत होते; मात्र सुधारित महामार्गांमुळे हा वेळ सध्या सुमारे दोन ते अडीच तासांपर्यंत आला असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच मुंबई-बंगळुरू प्रवास पाच तासांत पूर्ण करता येईल, अशा दर्जाचे रस्ते विकसित करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
रस्ते बांधकामात तंत्रज्ञान आणि एआयचा वापर वाढवण्यावरही गडकरी यांनी भर दिला. सॅटेलाइटशी जोडलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्त्यांवरील त्रुटी आणि डिफेक्ट शोधण्याची यंत्रणा विकसित केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अटल सेतू ते पागोटे चौक आणि पुढे पुण्याशी जोडणाऱ्या मार्गांसह शिळफाटा-पनवेल आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या सुधारणांवरही लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. या प्रकल्पांमुळे पुण्याची वाहतूक व्यवस्था नेमकी किती बदलणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
टोलबाबतही गडकरींचे स्पष्ट मत: चांगल्या दर्जाच्या आणि वेगवान रस्त्यांची सुविधा मिळत असेल, तर त्यासाठी टोल द्यावा लागेल, अशी भूमिका गडकरी यांनी व्यक्त केली.