फैजान अन्सारींचा गंभीर आरोप; अभिजीत दीपके यांच्या अटकेची मागणी
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे दीपके यांच्या समर्थकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात दीपके यांना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, आरटीआय कार्यकर्त्यांनी भगवान दीपके यांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी केल्यानंतर अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवर प्रश्न उपस्थित करत त्यांना पदवी सार्वजनिक करण्याचे आव्हान दिले. या सर्व घडामोडींमुळे दीपके यांच्याभोवतीचा वाद अधिकच गडद झाला असून, त्यांच्या विरोधातील तक्रारीवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे दीपके यांच्या समर्थकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून अभिजीत दीपके यांना तातडीने अटक करण्याची मागणी अन्सारी यांनी केली आहे.
फैजान अन्सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दिल्लीच्या डीसीपी कार्यालयात अभिजीत दीपके यांच्या विरोधात लेखी तक्रार सादर केली असून, दीपके यांच्या समर्थकांकडून झालेल्या कथित मारहाणीचे पुरावे आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. तसेच, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या हल्ल्यांप्रकरणी यापूर्वीच दोन गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अभिजीत दीपके यांच्याभोवती वादाचे आणखी एक प्रकरणही सध्या चर्चेत आहे. नुकतीच आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी दीपके यांचे वडील भगवान दीपके यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीवर प्रतिक्रिया देताना अभिजीत दीपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले. सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम त्यांची पदवी सार्वजनिक करावी. त्यानंतर मी माझ्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा संपूर्ण तपशील जाहीर करेन. माझी पदवी खरी आहे आणि मला आशा आहे की, नरेंद्र मोदी यांची पदवीही खरी असेल."
या विधानामुळे आधीच चर्चेत असलेल्या अभिजीत दीपके यांच्या भोवतीचा वाद अधिकच गडद झाला आहे. एकीकडे त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी होत असताना, दुसरीकडे फैजान अन्सारी यांनी त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने राजकीय आणि सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे.
तक्रार दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फैजान अन्सारी म्हणाले, "अभिजीत दीपके यांच्या माणसांनी माझ्यावर हल्ला केल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अभिजीत दीपके यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी."
यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांच्या कामगिरीचेही कौतुक केले. "सोनम वांगचुक यांना योग्य वेळी ताब्यात घेतल्यामुळे दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली. त्याबद्दल मी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि"अभिजीत दीपके हे सर्व काही स्वतःच्या राजकीय आणि वैयक्तिक फायद्यासाठी करत आहेत," असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, फैजान अन्सारी यांनी केलेल्या आरोपांवर अभिजीत दीपके किंवा कॉकरोच जनता पार्टीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे दिल्ली पोलीस या तक्रारीची कोणत्या पद्धतीने दखल घेतात, तपासात कोणती माहिती समोर येते आणि पुढील कायदेशीर कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.