4 वर्षांचा विश्वास अन् एका सकाळी विश्वासघात! मालकाचे हात-पाय बांधून 50 लाखांचे दागिने, 4 लाखांची रोकड लंपास
अकोला शहरातील नया जीन परिसरात भरदिवसा धक्कादायक दरोड्याची घटना समोर आली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून कामावर असलेल्या हमालानेच दोन साथीदारांच्या मदतीने मालकाच्या घरात दरोडा टाकल्याचा आरोप आहे. मालकाचे हात-पाय बांधून आरोपींनी तब्बल 50 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 4 लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. या घटनेनंतर रामदास पेठ पोलिसांनी तपास सुरू केला असून, हा दरोडा पूर्वनियोजित होता का, याचा शोध घेतला जात आहे.

अकोला : अकोला शहरात भरदिवसा घडलेल्या दरोड्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. चार ते पाच वर्षांपासून विश्वासाने कामावर ठेवलेल्या हमालानेच आपल्या मालकाचा विश्वासघात करत दोन साथीदारांच्या मदतीने घरात दरोडा टाकल्याचा आरोप आहे. आरोपींनी मालकाचे हात-पाय बांधून घरातील 50 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 4 लाख रुपयांची रोकड लंपास केली.
ही घटना रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहता मिल रोड, नया जीन परिसरात सोमवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. विजयकुमार गुप्ता हे घराच्या खालीच ‘गुप्ता फ्लॉवर ऑइल इंडस्ट्रीज’ हा व्यवसाय चालवतात.
नेहमीप्रमाणे गुप्ता हे सकाळी आपल्या कामगारांना कामाच्या सूचना देण्यासाठी खाली आले होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या तिघांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यानंतर आरोपींनी गुप्ता यांना घरात नेऊन मारहाण केली आणि त्यांचे हात-पाय बांधून एका खोलीत डांबून ठेवल्याचे समोर आले आहे.
विश्वासू हमालच निघाला दरोड्याचा सूत्रधार?
गुप्ता यांच्या माहितीनुसार, त्यांच्याकडे गेल्या चार ते पाच वर्षांपासून हमालीचे काम करणारा कर्मचारी या दरोड्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. मागील काही दिवसांपासून तो एका अनोळखी व्यक्तीला सोबत घेऊन येत होता. सोमवारी सकाळी आणखी एका साथीदारासह तिघांनी घरात प्रवेश केला आणि दरोडा टाकल्याचे सांगण्यात येत आहे.
तिजोरीतील रोकड आणि सोन्यावर डल्ला
गुप्ता यांना असहाय्य केल्यानंतर आरोपींनी घरातील तिजोरीवर डल्ला मारला. त्यातून गुप्ता यांचे अडीच लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीचे दीड लाख रुपये, अशी एकूण 4 लाख रुपयांची रोकड, तसेच सुमारे 50 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन आरोपी पसार झाले.
पोलिसांसमोर अनेक प्रश्न
घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. घरातील तिजोरी आणि मौल्यवान ऐवजाची माहिती आरोपींना आधीपासून होती का? हमालाने दरोड्याचा कट आधीच आखला होता का? या दरोड्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व शक्यतांचा पोलीस तपास करत आहेत.
भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे अकोल्यातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.