“थोबाडं काळी झाली असती…”; अमित शाहांच्या भाषणावरून फडणवीसांचा संताप, नेमकं काय घडलं?

अमित शाहांच्या हिंदी भाषेसंदर्भातील वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय वाद पेटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार करत “पूर्ण भाषण ऐकलं असतं तर थोबाडं काळी झाली असती” असा टोला लगावला. यासोबतच राज ठाकरेंची सूचक पोस्ट, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी आणि दिशा सालियन प्रकरणावरही फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली.

Devendra_Fadanvis

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हिंदी भाषेसंदर्भातील वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर त्यांच्यावर अशी टीका झालीच नसती, असा दावा करत फडणवीसांनी विरोधकांना थेट सुनावलं.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका सूचक पोस्टपासून ते मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आता कोणता नवा वाद पेटणार? याकडे लक्ष लागलं आहे.

अमित शाहांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार

नवी मुंबईत झालेल्या राजभाषा संमेलनात अमित शाह यांनी हिंदीविरोधकांवर टीका केली होती. महाराष्ट्र ही देशातील सर्वात मोठी बहुभाषिक भूमी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मातृभाषेसोबत दुसरी राष्ट्रीय भाषा शिकण्याला विरोध करणारे पाप करत असल्याचंही शाह यांनी म्हटलं होतं.

यानंतर ठाकरे गट, मनसेसह विरोधकांनी अमित शाहांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर अशी टीका झाली नसती. महाराष्ट्रात मराठीचं महत्त्व काय आहे, मातृभाषेचं महत्त्व काय आहे, हे अमित शाहांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं होतं.

“महाराष्ट्रातील लोक बहुभाषिक आहेत, याचा अर्थ माझी मातृभाषा बदलते असा नाही. सिलेक्टिव्ह ऐकायचं आणि त्यावर टीका करायची हे योग्य नाही,” असं फडणवीसांनी म्हटलं.

पुढे त्यांनी विरोधकांना टोला लगावत, “अमित शाह काय बोलले हे पूर्ण ऐकलं असतं तर यांची थोबाडं काळी झाली असती,” असं वक्तव्य केलं.

राज ठाकरेंची ती दोन वाक्यांची पोस्ट चर्चेत

अमित शाहांच्या वक्तव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका सूचक पोस्टचीही चर्चा सुरू आहे.

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच...” अशी मोजक्या शब्दांतील पोस्ट राज ठाकरेंनी केली.

राज ठाकरेंनी थेट कोणाचंही नाव घेतलेलं नसले तरी ही पोस्ट अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या हिंदी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर काय म्हणाले फडणवीस?

मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं.

कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली असून पुन्हा अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखणं महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तसंच, मनोज जरांगे यांच्या अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या असून काही प्रश्न न्यायालयात असल्याचं फडणवीसांनी नमूद केलं.

दिशा सालियन प्रकरणावरही फडणवीसांची सावध भूमिका

दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने नव्याने एफआयआर दाखल केल्याच्या चर्चेवरही मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांचं नाव असल्याचा दावा केला जात आहे.

यावर फडणवीसांनी सावध प्रतिक्रिया दिली.

दिशा सालियन प्रकरणातील एफआयआर आपण पाहिलेली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे. त्यामुळे त्यावर तर्कवितर्क करणं योग्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हिंदीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा राजकीय वाद आता मराठी अस्मिता, राज ठाकरे यांची सूचक पोस्ट आणि आगामी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आणखी रंगण्याची शक्यता आहे. फडणवीसांच्या “थोबाडं काळी झाली असती” या वक्तव्यावर विरोधकांकडून आता काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Inline Article Ad 728x90