‘12 मागण्या मान्य’ म्हणतंय सरकार, पण जरांगे म्हणतात ‘एकही नाही’; नेमकं काय घडलं?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 11वा दिवस आहे. सरकारकडून 15 पैकी 12 मागण्या मान्य झाल्याचा दावा करण्यात येत असताना, जरांगे पाटील यांनी सरकारचा हा दावा फेटाळून लावला आहे. ‘15 पैकी एकही मागणी मान्य झालेली नाही’, असा दावा करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. याचवेळी मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांच्या वक्तव्यांनाही जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर देत थेट इशारा दिला आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 11वा दिवस आहे. एकीकडे सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात मागण्यांवर चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे, सरकारकडून मागण्या मान्य झाल्याचा दावा केला जात असतानाच जरांगे पाटील यांनी हा दावा थेट फेटाळून लावला आहे.
मंत्री उदय सामंत यांनी 15 पैकी 12 मागण्या मान्य झाल्याचं म्हटलं. मात्र, जरांगे पाटील यांनी सरकारने एकही मागणी मान्य केली नसल्याचं सांगत सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे आता ‘12 मागण्या मान्य की एकही नाही?’ असा सवाल निर्माण झाला आहे.
‘15 पैकी एकही मागणी मान्य नाही’
जरांगे पाटील म्हणाले की, “15 पैकी 12 मागण्या मान्य, याला न्याय देणं म्हणत नाहीत. तुम्ही काहीही मान्य केलं नाही. 15 पैकी एकही मागणी मान्य झालेली नाही.”
सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. शिष्टमंडळासमोर एक भूमिका आणि गाडीत किंवा हॉटेलमध्ये वेगळी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
उदय सामंतांच्या वक्तव्यावर जरांगेंचा पलटवार
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एकेरी भाषेत बोलू नये, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं. यावर जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
“चुकीच्याला चुकीचं म्हणू नको काय? तुम्ही आम्हाला दलाल म्हणून बोलायला ठेवलं आहे का? शिंदेंनी चूक केली ती कबूल करा,” असं म्हणत त्यांनी सरकारला सुनावलं.
एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलल्याचं वाईट वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं. मात्र, काही निर्णयांवर प्रश्न उपस्थित करत “आमचे प्रमाणपत्र रद्द का केले?” असा सवाल त्यांनी केला.
‘फडणवीस, शिंदेंच्या सांगण्यावरून आमच्यावर हल्ला करता का?’
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही जरांगे पाटील यांनी टीका केली. मराठा समाजाला अर्धवट अवस्थेत सोडल्याचा आरोप करत त्यांनी सरकारमधील नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.
“फडणवीस, शिंदे यांच्या सांगण्यावरून तुम्ही आमच्यावर हल्ला करता का?” असा थेट सवाल त्यांनी केला.
मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीवरही भाष्य
नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाने घेतलेल्या बैठकीबाबतही जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. या बैठकीबाबत आपल्याला काही बोलायचं नसल्याचं सांगताना त्यांनी संबंधित नेत्यांच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त केली.
“विखे पाटलांचा यांना आसरा असू शकतो,” असा दावा करत त्यांनी या प्रकरणात राजकीय समीकरणांचा संदर्भ दिला.
भरत गोगावलेंना थेट इशारा
दरम्यान, एकेरी भाषेचा वापर केल्यास जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा मंत्री भरत गोगावले यांनी दिला होता. त्यावरही जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली.
“मी तयार आहे, कधीही सज्ज आहे. माझ्या नादेला लागायचं नाही. माझ्याकडे पुरावे आहेत. मीडियात पुरावे देईन,” असं म्हणत त्यांनी गोगावलेंना प्रत्युत्तर दिलं.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमधील नेत्यांनी अनावश्यक वक्तव्य करू नये, असंही जरांगे पाटील यांनी सुनावलं.
‘आरक्षण द्यायचं नसेल तर अंतरवालीत येऊ नका’
“तुम्हाला आरक्षण द्यायचा कंटाळा आला असेल आणि यावर बोलू नका, त्यावर बोलू नका असं म्हणायचं असेल तर शिष्टमंडळाने अंतरवालीत येऊ नये,” असं जरांगे पाटील म्हणाले.
तसंच, मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे नसतील तर अंतरवालीत येऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला.
आता पुढे काय?
एकीकडे सरकारकडून 12 मागण्या मान्य झाल्याचा दावा, तर दुसरीकडे एकही मागणी मान्य झाली नसल्याचं जरांगे पाटील यांचं म्हणणं—यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. उपोषणाचा 11वा दिवस सुरू असताना सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील चर्चेतून नेमका काय तोडगा निघतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.