खासगी फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी अन् लॉजमध्ये तरुणीची आत्महत्या; डोंबिवली हादरली!
डोंबिवलीतील गोळवली परिसरातील लॉजमध्ये २३ वर्षीय फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध तोडल्यानंतर खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मानसिक छळ केल्याचा आरोप तरुणीच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी सुमित खवळे याला अटक केली आहे.

डोंबिवली : प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद आणि खासगी फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याच्या कथित धमक्यांमुळे एका २३ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. गोळवली परिसरातील एका लॉजमध्ये विद्यार्थिनी मृतावस्थेत आढळली. मानसी गावकर असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती अंबरनाथ येथील बी. आर. हर्णे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये शिक्षण घेत होती. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी सुमित खवळे (वय ३०) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानसी आणि सुमित हे दोघेही मुंबईतील कांजूरमार्ग परिसरातील रहिवासी होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, सुमितच्या वैवाहिक आयुष्याबाबत माहिती मिळाल्यानंतर मानसीने त्याच्याशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतल्याचा दावा तिच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे. त्यानंतर मानसीने सुमितशी बोलणे बंद केले. मात्र, तो इन्स्टाग्रामसह विविध माध्यमांतून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. तसेच तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन मानसिक त्रास देत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
८ ऑक्टोबर रोजी मानसी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. तिचा मोबाईलही लागत नसल्याने चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, मानसी डोंबिवलीतील गोळवली परिसरातील एका लॉजमध्ये थांबल्याचे समोर आले. ९ ऑक्टोबर रोजी खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने लॉज कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा उघडला असता मानसी मृतावस्थेत आढळून आली.
घटनास्थळी पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठीही सापडल्याचे वृत्त आहे. या चिठ्ठीत सुमित खवळे याच्यासह महाविद्यालयाच्या प्राचार्यांचाही उल्लेख असल्याचा दावा मानसीच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
मानसीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी सुमित खवळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. २२ ऑक्टोबर रोजी त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ बनसोडे करत आहेत. दरम्यान, खासगी फोटो-व्हिडिओच्या आधारे धमकावणे आणि मानसिक छळाच्या आरोपांमुळे या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.