अधिकारी गेले... पुन्हा सांडपाणी व्यवस्था तुंबले! नागरिकांचा संताप आश्वासन नको, कायमचा तोडगा द्या"

अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही परिसरातील ड्रेनेजची समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुन्हा ड्रेनेज तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर साचत असून दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. "केवळ आश्वासन नको, तर कायमस्वरूपी तोडगा काढा," अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

Pune Image

पुणे :महंमदवाडी येथील सय्यद नगर रोडवरील एका हॉटेलसमोर वारंवार ड्रेनेज तुंबून सांडपाणी रस्त्यावर वाहण्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. अनेक वेळा तक्रारी करून तसेच या समस्येकडे माध्यमांमधून लक्ष वेधूनही कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

गेल्या दोन दिवसांपासून ड्रेनेजचे घाण पाणी पुन्हा रस्त्यावर वाहत असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर अनेक शाळा असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज सांडपाण्यातून मार्ग काढत शाळेत जावे लागत आहे. तसेच दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

महापालिकेचे कर्मचारी, ड्रेनेज साफसफाईची व्हॅन आणि अधिकारी घटनास्थळी येऊन ड्रेनेज लाईन साफ केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र काही वेळातच त्याच ठिकाणाहून पुन्हा घाण पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने नागरिकांनी महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ तात्पुरती साफसफाई करून समस्या मिटल्याचे दाखवले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दरम्यान, शुक्रवार असल्याने नमाजासाठी मशिदीकडे जाणाऱ्या मुस्लिम बांधवांनाही याच घाण पाण्यातून जावे लागल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिकांच्या मते, ही समस्या केवळ वाहतुकीची नसून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर बाब आहे.

याचबरोबर नागरिकांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. संबंधित हॉटेलमधून कचरा आणि सांडपाणी ड्रेनेजमध्ये सोडले जात असल्यामुळेच ड्रेनेज वारंवार तुंबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ड्रेनेज लाईन जुनी असल्यामुळे ही समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे सांगितले आहे. मात्र नागरिकांचा सवाल आहे की, जर लाईन जुनी असेल तर ती बदलण्याची जबाबदारी कोणाची? वर्षानुवर्षे तात्पुरत्या उपाययोजनांवर भर देण्याऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत?

स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींवरही नाराजी व्यक्त करत निवडणुकीत दिलेल्या विकासाच्या आश्वासनांची आठवण करून दिली. सोशल मीडियावर सक्रिय राहण्यापेक्षा परिसरातील मूलभूत नागरी समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सध्या नागरिकांची एकच अपेक्षा आहे की, वारंवार होणाऱ्या या ड्रेनेज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, जबाबदारांची चौकशी करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करून परिसराला या त्रासातून कायमची मुक्तता मिळवून द्यावी.

Inline Article Ad 728x90