मराठी सिनेसृष्टीचा ‘गोंधळ’ थेट ऑस्करच्या दारात! 33 चित्रपटांना मागे टाकत भारताची अधिकृत एन्ट्री; ‘धुरंधर’ही शर्यतीत
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक संतोष दावखर यांच्या ‘गोंधळ’ चित्रपटाची ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून निवड झाली आहे. तब्बल 33 चित्रपटांच्या शर्यतीत ‘गोंधळ’ने बाजी मारली आहे.
.jpg)
मुंबई : हिंदी, तेलुगू, तमिळसह विविध भाषांमधील तब्बल 33 चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत होते. यामध्ये बॉक्स ऑफिसवर चर्चेत राहिलेल्या मोठ्या चित्रपटांचाही समावेश होता. मात्र या सगळ्यांना मागे टाकत एका मराठी चित्रपटाने बाजी मारली आहे. दिग्दर्शक संतोष दावखर यांच्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून निवड करण्यात आली आहे.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडून शुक्रवारी या निवडीची घोषणा करण्यात आली. ‘गोंधळ’ आता 99व्या अकादमी पुरस्कारांमधील बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म या श्रेणीसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
33 चित्रपटांमध्ये ‘गोंधळ’ची बाजी
यंदा भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत चित्रपट निवडण्याच्या प्रक्रियेत एकूण 33 चित्रपटांचा विचार करण्यात आला होता. यामध्ये हिंदीसह मराठी, तेलुगू, गुजराती, तमिळ आणि इतर भाषांतील चित्रपटांचा समावेश होता.
या स्पर्धेत ‘धुरंधर’, ‘धुरंधर: द रिव्हेंज’, ‘120 बहादूर’, ‘देऊळ बंद 2’, ‘तिघी’, ‘बॉर्डर 2’, ‘गांधी टॉक्स’, ‘इक्कीस’, ‘प्रवास’ आणि ‘हनुमान अंश’ यांसारख्या चित्रपटांचाही समावेश होता. मात्र अंतिम निर्णयात परीक्षकांनी ‘गोंधळ’ची भारताची अधिकृत ऑस्कर एन्ट्री म्हणून निवड केली.
काय आहे ‘गोंधळ’ची कथा?
ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर घडणारा ‘गोंधळ’ हा थ्रिलर चित्रपट असून महाराष्ट्रातील पारंपरिक गोंधळ या लोककला आणि धार्मिक परंपरेच्या पार्श्वभूमीवर त्याची कथा उलगडते. परंपरा, माणसाच्या इच्छा आणि त्यातून निर्माण होणारे संघर्ष या कथेतून मांडण्यात आले आहेत.
चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संतोष दावखर यांनी केले असून इशिता देशमुख, योगेश सोहोनी, किशोर कदम, सुरेश विश्वकर्मा, निशाद भोईर, अनुज प्रभू आणि विठ्ठल काळे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
ऑस्करपूर्वीही ‘गोंधळ’ने उमटवली छाप
ऑस्करच्या शर्यतीत पोहोचण्यापूर्वीच ‘गोंधळ’ने अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये लक्ष वेधून घेतले आहे. 2025 मध्ये झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया अर्थात IFFI मध्ये दिग्दर्शक संतोष दावखर यांना सिल्व्हर पीकॉक पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
तसेच विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटाला दाद मिळाली आहे. त्यामुळे भारताच्या अधिकृत ऑस्कर एन्ट्रीच्या घोषणेनंतर आता पुन्हा एकदा ‘गोंधळ’ची चर्चा सुरू झाली आहे.
आता पुढे काय?
‘गोंधळ’ची भारताकडून अधिकृत एन्ट्री झाली असली तरी त्याचा अर्थ चित्रपटाला ऑस्करचे अंतिम नामांकन मिळाले आहे, असा नाही. भारताकडून पाठवण्यात आलेल्या या चित्रपटाचा पुढील टप्प्यात अकादमीकडून विचार केला जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्ट आणि अंतिम नामांकनाची प्रक्रिया पार पडणार आहे.
99वा अकादमी पुरस्कार सोहळा 14 मार्च 2027 रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे. त्यामुळे आता ‘गोंधळ’ पुढील टप्प्यांपर्यंत मजल मारतो का आणि मराठी चित्रपटसृष्टीला ऑस्करच्या मंचावर आणखी एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह भारतीय चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.