सहा महिन्यांतच नात्याला पूर्णविराम! पृथ्वी शॉचा साखरपुडा मोडला, आकृती अग्रवालची भावनिक पोस्ट
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री-सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवाल यांनी परस्पर संमतीने आपला साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला आहे. आकृतीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत या निर्णयाची माहिती दिली असून, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अफवा किंवा तर्कवितर्क न करण्याची विनंती केली आहे
-1.jpg)
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पृथ्वी शॉ आणि त्याची मंगेतर आकृती अग्रवाल यांनी साखरपुडा मोडत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आकृती अग्रवालने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोघांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
पृथ्वी आणि आकृती यांनी 8 मार्च 2026 रोजी साखरपुड्याची घोषणा केली होती. पृथ्वी शॉने त्यावेळी सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. मात्र अवघ्या सहा महिन्यांनंतर दोघांनी आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
आकृती अग्रवालची भावनिक पोस्ट
आकृतीने आपल्या पोस्टमध्ये दोघांची भविष्यातील उद्दिष्टे आणि सध्याच्या परिस्थिती वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांनी वेगळे मार्ग निवडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. दोघांच्या मनात एकमेकांविषयी आदर आणि काळजी कायम असल्याचेही तिने नमूद केले. तसेच या निर्णयावर तर्कवितर्क न करता त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे.
साखरपुड्याची झाली होती मोठी चर्चा
मार्चमध्ये पृथ्वी शॉने आकृतीसोबतच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत आपल्या आयुष्यातील या नव्या टप्प्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आकृती अग्रवाल ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री असून तिने तेलुगू चित्रपट ‘Trimukha’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
दोघांच्या नात्याबाबत मागील काही काळापासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. मात्र आता आकृतीने स्वतः पोस्ट करत साखरपुडा संपल्याची अधिकृत माहिती दिल्यामुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे