हरियाणात धक्कादायक घटना! प्रियकरासोबत पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट; जिवंत अवस्थेत कालव्यात फेकल्याचा आरोप
हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील जर्थल गावातील २१ वर्षीय मोनू याची पत्नी तन्नू आणि तिचा कथित प्रियकर सोनू यांनी मिळून हत्या केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. पोलिसांच्या तपासात मोबाईलमधील डिलीट केलेले चॅट, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे कट उघडकीस आला असून पत्नी आणि एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सोनू आणि अमन अद्याप फरार आहेत.
हरियाणा : हरियाणातील Rewari जिल्ह्यातील जर्थल गावात एका २१ वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोनू नावाच्या तरुणाची पत्नी तन्नू आणि तिचा कथित प्रियकर सोनू यांनी मिळून हत्या केल्याचा आरोप असून, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला जिवंत अवस्थेत कालव्यात फेकण्यात आल्याचा दावा पोलिस तपासात करण्यात आला आहे.

माहितीनुसार, मोनू हा जर्थल गावचा रहिवासी होता. तो विविध ठिकाणी मजुरीची कामे करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने जालियावास येथे स्वतःचे छोटे दुकान सुरू केले होते. लग्नानंतरही तन्नूचे कथित प्रियकर सोनूसोबत संबंध कायम असल्याचा संशय तपासादरम्यान व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मोनू हा त्यांच्या संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला.
घटनेच्या रात्री तन्नूने मोनूला कसोली गावात बोलावल्याचा आरोप आहे. तेथे सोनू आणि त्याचे साथीदार हरिओम व अमन यांनी मोनूला पकडून त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला जिवंत अवस्थेत असलवास कालव्यात फेकण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दोन दिवसांनी कालव्यातून मोनूचा मृतदेह सापडल्यानंतर सुरुवातीला कुटुंबीयांनी हा अपघाती मृत्यू असावा, असा समज केला होता. अंत्यसंस्कारावेळी तन्नूने दुःख व्यक्त करत रडण्याचे नाटक केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे, ज्यामुळे कोणालाही तिच्यावर संशय आला नव्हता.
मात्र, काही दिवसांनंतर मोनूच्या कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी त्याच्या मोबाईलमधील माहिती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला. डिजिटल तपासात मोबाईलमधून हटवलेले चॅट, कॉल लॉग आणि इतर माहिती समोर आली. तपासात तन्नू आणि सोनू यांच्यातील तब्बल ४९ फोन कॉल्स तसेच कथित कटाशी संबंधित संभाषणाचे पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
हे पुरावे कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिल्यानंतर तपासाला वेग आला. पोलिसांनी तन्नू आणि हरिओम या आरोपींना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी सोनू आणि त्याचा साथीदार अमन हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हरियाणा पोलीस करत असून, फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.