तीन दिवसांपेक्षा जास्त प्रवास अन् 4,188 किमीचा पल्ला! भारतातील 'या' ट्रेनची गोष्टच वेगळी
भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्गावर धावणारी विवेक एक्सप्रेस आसाममधील दिब्रुगढ ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी असा तब्बल 4,188 किलोमीटरचा प्रवास करते. सुमारे 75 तासांच्या या प्रवासात विविध राज्यांतील निसर्गसौंदर्य, संस्कृती आणि खाद्यपरंपरा अनुभवता येतात.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचा प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे नाही, तर देशातील निसर्गसौंदर्य आणि विविध संस्कृती अनुभवण्याची संधीही असते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, भारतात अशी एक रेल्वे आहे, जी सलग 75 तास प्रवास करते? विशेष म्हणजे, ही रेल्वे तब्बल 4,188 किलोमीटरचे अंतर पार करते. या गाडीचे नाव आहे 'विवेक एक्सप्रेस'.
आसाममधील दिब्रुगढ ते तामिळनाडूमधील कन्याकुमारीदरम्यान धावणारी विवेक एक्सप्रेस देशातील सर्वात लांब पल्ल्याची नियमित प्रवासी रेल्वे म्हणून ओळखली जाते. ट्रेन क्रमांक 22504 चा हा प्रवास पूर्ण होण्यासाठी 74 तास 45 मिनिटे लागतात. म्हणजेच प्रवासी चौथ्या दिवशी आपल्या इच्छित स्थळी पोहोचतात.
खिडकीतून अनुभवता येणार भारताचे निसर्गसौंदर्य!
विवेक एक्सप्रेसचा प्रवास आसाममधील हिरव्यागार प्रदेशातून सुरू होतो. पुढे पश्चिम बंगालमधील ग्रामीण भाग, ओडिशातील नद्या, आंध्र प्रदेशातील किनारपट्टीचा परिसर आणि दक्षिण भारतातील हिरवळ प्रवाशांना आकर्षित करते.
विशेष म्हणजे, या प्रवासादरम्यान वेगवेगळ्या राज्यांतील भाषा, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैली अनुभवायला मिळते. विशाखापट्टणम, विजयवाडा, कोईम्बतूर आणि तिरुवनंतपुरम यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमधून ही रेल्वे पुढे कन्याकुमारीला पोहोचते.
विवेक एक्सप्रेसचे वैशिष्ट्य काय?
स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या विवेक एक्सप्रेसला भारतीय रेल्वेच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. ही रेल्वे ईशान्य भारताला देशाच्या दक्षिण टोकाशी जोडते. सध्या ही गाडी दररोज धावत असून प्रवाशांसाठी स्लीपर आणि वातानुकूलित डब्यांची सुविधा उपलब्ध आहे.
या रेल्वेने प्रवास करण्याचा विचार असेल, तर तिकीट आगाऊ आरक्षित करणे आवश्यक आहे. तसेच, जवळपास तीन दिवसांपेक्षा अधिक काळ प्रवास असल्याने पाणी, खाद्यपदार्थ, आवश्यक औषधे आणि इतर साहित्य सोबत ठेवणे फायद्याचे ठरते.
प्रवासाचे अद्ययावत वेळापत्रक, तिकीट दर आणि थांब्यांची माहिती IRCTC किंवा रेल्वेच्या अधिकृत माध्यमांवर तपासावी.