लग्नासाठी प्रभाव पाडायचा होता, पण RPF वर्दीने उघड केला भांडाफोड; जळगाव रेल्वे स्थानकात तोतया महिला पोलिसाला अटक

जळगाव रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्यदिनी RPFची वर्दी घालून फिरणाऱ्या एका तरुणीला सुरक्षा दलाने ताब्यात घेतले. चौकशीत ती RPF कर्मचारी नसल्याचे उघड झाले. प्राथमिक तपासात लग्नाच्या उद्देशाने स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी तिने पोलिसांची वर्दी वापरल्याचे समोर आले आहे. तिच्याकडे काही बनावट कागदपत्रेही आढळल्याने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Maharashtra-Police

जळगाव : रेल्वे स्थानकावर RPFची वर्दी घालून फिरणारी एक तरुणी सुरुवातीला सुरक्षा दलाच्या नजरेत आली आणि त्यानंतर काही वेळातच तिचा बनाव उघड झाला. 15 ऑगस्ट रोजी जळगाव रेल्वे स्थानकावर RPFकडून तपासणी सुरू असताना ही तरुणी संशयास्पदरीत्या फिरताना आढळली.

चौकशीदरम्यान तिने आपण नाशिक RPFमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले. मात्र, तिच्याकडे अधिकृत ओळखपत्र नसल्याने सुरक्षा दलाचा संशय अधिक बळावला. RPFच्या अधिकाऱ्यांनी नाशिक येथील संबंधित विभागाशी संपर्क साधून तिच्या नियुक्तीची पडताळणी केली. त्यावेळी ती RPF कर्मचारी नसल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर अधिक चौकशी केली असता तरुणीने आपली खरी ओळख सांगितली. ती जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. प्राथमिक तपासानुसार, लग्नासाठी संभाव्य स्थळांवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने तिने पोलिसांची वर्दी वापरल्याचा संशय आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही तिने महाराष्ट्र पोलिसांच्या वर्दीत फोटो काढल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तिच्याकडे काही बनावट कागदपत्रेही आढळल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

या तरुणीने पोलिस असल्याचे भासवून यापूर्वी कोणाची फसवणूक केली होती का, तसेच RPFची वर्दी घालून रेल्वे स्थानकावर येण्यामागे नेमका आणखी काही उद्देश होता का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

जळगावात शेअर बाजाराच्या आमिषाने वकिलाला 7.60 लाखांचा गंडा

दरम्यान, जळगावमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. रशियन कंपनीचे शेअर्स विकत घेऊन मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत वकील विजय दानोज यांच्याकडून 7 लाख 60 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी विनोद सोनार आणि आनंद परदेशी यांच्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी बनावट कंपनी आणि फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून संपर्क साधून वकिलांना गुंतवणुकीस प्रवृत्त केल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, गुंतवणुकीची रक्कम परत मिळत नसल्याने फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Inline Article Ad 728x90