झाकीर गनी ठार! पहलगाम हल्ल्याच्या तपासाला मोठं वळण
शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दोन दहशतवादी ठार झाले. या कारवाईत पहलगाम हल्ल्यातील संशयित झाकीर गनी ठार झाल्याने तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दलांनी राबवलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ठार झालेल्यांमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणातील प्रमुख संशयित झाकीर गनी याचाही समावेश असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोपियांमधील मीमंदर परिसरात गुप्त देखरेखीदरम्यान दोन संशयित दहशतवादी आढळून आल्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी संयुक्तपणे परिसराला वेढा घातला. खबरदारीचा उपाय म्हणून आसपासची काही गावे रिकामी करण्यात आली.
त्यानंतर शोपियांमधील सैदपोरा पायीनजवळील छानपोरा गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या कारवाईत लष्कराच्या व्हिक्टर फोर्सने सहभाग घेतला होता. दहशतवाद्यांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी परिसरातील सर्व संभाव्य मार्ग बंद करण्यात आले होते. रात्रभर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान अंधारामुळे काही काळ शोधमोहीम स्थगित करण्यात आली होती.
सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, झाकीर गनी हा पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणातील प्रमुख संशयितांपैकी एक होता. या हल्ल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या १४ स्थानिक संशयित दहशतवाद्यांच्या यादीत त्याचे नाव होते. तसेच, ऑक्टोबर २०२५ मध्ये राष्ट्रीय तपास संस्थाच्या न्यायालयाने त्याच्याविरुद्ध नोटीसही जारी केली होती. या कारवाईनंतर संबंधित प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.