आत्महत्या प्रकरणात नवा आरोप; पोलिस अधिकाऱ्याचे नाव FIR मधून वगळल्याचा कुटुंबीयांचा दावा
करण बाळासाहेब कांबळे यांच्या आत्महत्या प्रकरणात महत्त्वाच्या आरोपीचे नाव एफआयआरमधून वगळल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओमध्ये अर्जुन मोहिते यांचे नाव स्पष्ट असल्याचे सांगत, निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली आहे.

पुणे : पुण्यातील खराडी पोलीस ठाण्यात 1 जून 2026 रोजी नोंद झालेल्या करण बाळासाहेब कांबळे यांच्या आत्महत्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात महत्त्वाच्या आरोपीचे नाव जाणूनबुजून एफआयआरमधून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, करण कांबळे यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये https://www.instagram.com/reel/DaaRwOVplcX/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== अर्जुन मोहिते या पोलीस अधिकाऱ्याचे नाव स्पष्टपणे नमूद केले आहे. मात्र, संबंधित व्यक्ती पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांचे नाव एफआयआरमध्ये टाकण्यात आले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा प्रकार केवळ संशयास्पद नसून निष्पक्ष तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे.
या प्रकरणाबाबत त्यांनी संबंधित यंत्रणांकडे वारंवार अर्ज, निवेदने आणि विनंत्या केल्याचेही सांगितले. तरीदेखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे न्याय मिळण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेत बोलताना कुटुंबीयांनी सांगितले की, “एखाद्या महत्त्वाच्या आरोपीचे नाव जाणीवपूर्वक एफआयआरमधून वगळले जात असेल, तर तपासाच्या निष्पक्षतेवर गंभीर शंका निर्माण होते.” संबंधित व्यक्तीचे नाव एफआयआरमध्ये तातडीने समाविष्ट करून प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
दरम्यान, मागणीची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने कायदेशीर आंदोलन छेडण्याचा इशाराही कुटुंबीयांनी दिला आहे. या आरोपांमुळे आता हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले असून पुढील तपासावर सर्वांचे लक्ष लागले आहे.