मला केतनसोबत लग्न करायचे नव्हते, म्हणून हत्या केली' – मुख्य आरोपी सिया गोयलचा कबुलीजबाब

एमसीआरमध्ये पाठवण्यापूर्वी पोलिस कोठडीत असतानाच सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याकडून गुन्ह्याची कबुली; पोलिसांच्या कौशल्यपूर्ण चौकशीत महत्त्वाची माहिती उघड

siya goya'

पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याप्रकरणात तपासाला निर्णायक वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी सिया गोयल हिने पोलिस कोठडीत असताना केतन अग्रवालच्या हत्येची कबुली दिली असून, "मला केतनसोबत लग्न करायचे नव्हते, म्हणून मी केतन अग्रवालची हत्या केली," असा महत्त्वपूर्ण जबाब पोलिसांकडे नोंदवण्यात आला आहे. या कबुलीजबाबामुळे संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला नवी दिशा मिळाली आहे.

माहितीनुसार, सिया गोयल आणि या प्रकरणातील दुसरा आरोपी चेतन चौधरी यांना न्यायालयीन कोठडीत (एमसीआर) पाठवण्यापूर्वी पोलिस कोठडीत सखोल चौकशी करण्यात आली होती. याच चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याबाबत महत्त्वाची माहिती दिली असून, केतन अग्रवालच्या हत्येची कबुलीही नोंदवली गेली आहे.

तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे समोर आले होते. विविध जबाबांमध्ये विसंगती आढळून येत असल्याने पोलिसांनी चौकशीची दिशा बदलत मानसशास्त्रीय पद्धतीने आणि विश्वासात घेऊन आरोपींची चौकशी केली. याच कौशल्यपूर्ण तपास पद्धतीमुळे अखेर आरोपींकडून संपूर्ण घटनाक्रमाची माहिती समोर आली.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सिया गोयलने केतन अग्रवालसोबत विवाह करण्याची इच्छा नसल्याचे सांगत, याच कारणातून हत्येचा कट रचल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात चेतन चौधरीची भूमिकाही तपास यंत्रणांकडून बारकाईने तपासली जात असून, दोन्ही आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास वेगाने सुरू आहे.

या कबुलीजबाबानंतर केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांकडून इतर पुरावे, तांत्रिक माहिती आणि घटनाक्रमाची पडताळणी करण्याचे कामही सुरू आहे.

दरम्यान, केतन अग्रवाल हत्याप्रकरणात नोंदवण्यात आलेला हा कबुलीजबाब तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणातील पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


Inline Article Ad 728x90