केतन अग्रवाल हत्या प्रकरण : लोहगडावर 'क्राईम सीन रिक्रिएशन'; तपास अंतिम टप्प्यात

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलत लोहगड किल्ल्यावर 'क्राईम सीन रिक्रिएशन' (घटनास्थळाचे प्रात्यक्षिक) केले. तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून, गुन्हा नेमका कसा घडला आणि आरोपींच्या हालचाली काय होत्या, याची खातरजमा करण्यासाठी मुख्य आरोपी सिया गोयल हिला रविवारी कडक पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी नेण्यात आले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली. तपासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सकाळी ६ ते ११ या वेळेत पर्यटकांना लोहगड किल्ल्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती.

recreate siya goyalSAKSHI MEGHA PRABHU

लोहगडावर 'क्राईम सीन रिक्रिएशन'

पोलिसांच्या माहितीनुसार, गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम पुन्हा उभा करून आरोपींच्या हालचालींची पडताळणी करणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता. तपास अधिक अचूक व्हावा यासाठी केतन अग्रवाल यांच्या उंची आणि वजनाशी साधर्म्य असलेला डमी पुतळा तयार करण्यात आला.

या डमीच्या सहाय्याने आरोपींनी केतन अग्रवाल यांना नेमक्या कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या पद्धतीने दरीत ढकलले असावे, याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान घटनास्थळावरील प्रत्येक हालचाल आणि परिस्थिती बारकाईने तपासण्यात आली.

हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा संशय?

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल यांच्या हत्येचा कट पुण्यातील कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथील एका कॅफेमध्ये रचल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांच्या दाव्यानुसार, १८ जून रोजी सिया गोयल केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली, तर सहआरोपी चेतन चौधरी आधीच तेथे उपस्थित होता. कड्याच्या टोकावर पोहोचल्यानंतर सियाने दिलेल्या कथित इशाऱ्यानंतर चेतनने मागून येत केतन अग्रवाल यांना खोल दरीत ढकलल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे.

एचडी कॅमेऱ्यांत संपूर्ण प्रक्रिया

क्राईम सीन रिक्रिएशनची संपूर्ण प्रक्रिया हाय-डेफिनिशन (HD) कॅमेऱ्यांद्वारे चित्रित करण्यात आली आहे. या चित्रीकरणातील दृश्ये, घटनास्थळावरील निरीक्षणे आणि आरोपींच्या हालचालींची माहिती तपासातील महत्त्वाचा पुरावा म्हणून वापरली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या माध्यमातून घटनाक्रमातील प्रत्येक बाब वैज्ञानिक पद्धतीने पडताळून तपास अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांची प्रतिक्रिया

पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले की, गुन्हा नेमका कशा प्रकारे घडला आणि आरोपींच्या हालचाली काय होत्या, याची खातरजमा करण्यासाठी 'क्राईम सीन रिक्रिएशन' आवश्यक होते. या प्रक्रियेतून मिळालेली माहिती पुढील तपासात महत्त्वाची ठरणार असून प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.




Inline Article Ad 728x90