महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 9 जिल्ह्यांत तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनी वारे बळकट होण्याची शक्यता आहे.

Ai Generated
मुंबई : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून काही भागांत जोरदार पाऊस सुरू आहे, तर अनेक ठिकाणी सध्या पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान, आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कसे राहणार आणि कोणत्या भागांत पावसाची शक्यता आहे, याबाबत ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी माहिती दिली आहे.
माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, आजपासून सोमवार, 17 ऑगस्टपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा 27 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा 15 ऑगस्टही पावसाच्या सरींसोबत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, उर्वरित मराठवाडा, अहिल्यानगर आणि सोलापूरसह एकूण 9 जिल्ह्यांमध्ये मात्र केवळ तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे खुळे यांनी सांगितले आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्रातील पश्चिमी मान्सूनी वाऱ्यांना बळकटी मिळण्याची शक्यता आहे. हे वारे अधिक दक्षिण-वायव्य दिशेने सरकल्यास ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र, ही शक्यता परिस्थितीवर अवलंबून असून त्यामध्ये ‘जर-तर’चे कंगोरे असल्याचे माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील अनेक भागांत अद्याप अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात मुंबईसह कोकण, पुणे, कोल्हापूर आणि विदर्भातील काही भागांत चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक नद्या-नाल्यांना पाणी आले होते, तर काही ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली होती. धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली.
मात्र, राज्याच्या निम्म्याहून अधिक भागात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अनेक भागांत पाऊस नसल्याने पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी पेरण्या रखडल्या असून, ज्या भागात पेरणी झाली आहे तेथेही पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील काही दिवसांतील पावसाकडे लागले आहे.