मेकअप करताना चुकूनही करू नका 'या' 5 चुका! नाहीतर चेहऱ्याचं सौंदर्य बिघडू शकतं
सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी अनेक जण मेकअपचा वापर करतात. कॉलेज असो, ऑफिस असो किंवा एखादा खास कार्यक्रम. मेकअप हा अनेक महिलांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, अनेकदा मेकअप करताना केलेल्या काही छोट्या चुका तुमचा लूक खराब करू शकतात. चुकीच्या पद्धतीने मेकअप केल्यास त्वचा कोरडी दिसणे, मेकअप पॅची होणे किंवा चेहरा तेलकट दिसणे अश्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मेकअप करताना या पाच चुका टाळणे महत्त्वाचे आहे.

Beauty Tips : सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी अनेक जण मेकअपचा वापर करतात. कॉलेज असो, ऑफिस असो किंवा एखादा खास कार्यक्रम. मेकअप हा अनेक महिलांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, अनेकदा मेकअप करताना केलेल्या काही छोट्या चुका तुमचा लूक खराब करू शकतात. चुकीच्या पद्धतीने मेकअप केल्यास त्वचा कोरडी दिसणे, मेकअप पॅची होणे किंवा चेहरा तेलकट दिसणे अश्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मेकअप करताना या पाच चुका टाळणे महत्त्वाचे आहे.
1. मॉइश्चरायझर न लावता मेकअप करणे
मेकअप करताना अनेक जण थेट चेहऱ्यावर फाउंडेशन किंवा कन्सीलर लावतात. मेकअप करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करून योग्य मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. अनेक वेळा घाईत आपण मॉइश्चरायझर न लावता मेकअप करतो. त्यामुळे त्वचेमध्ये पुरेसा ओलावा नसल्यास फाउंडेशन काही भागांवर जास्त साचू शकते. चेहरा कोरडा, खडबडीत आणि पॅची दिसू शकतो. विशेषतः कोरडी त्वचा असणाऱ्यांना ही समस्या अधिक जाणवू शकते. त्यामुळे त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर वापरा.
2. चुकीच्या शेडचे फाउंडेशन वापरणे
मेकअपमध्ये फाउंडेशनची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, अनेकदा गोरे दिसण्यासाठी आपल्या नैसर्गिक त्वचेच्या रंगापेक्षा खूप फिकट फाउंडेशन निवडतो. काही जणी चुकीचा अंडरटोन असलेले फाउंडेशन वापरतात. त्यामुळे चेहरा आणि मान यांच्या रंगात स्पष्ट फरक दिसू शकतो. फाउंडेशनची चुकीची शेड वापरल्यास चेहरा राखाडी किंवा अनैसर्गिक दिसू शकतो. त्यामुळे तुमच्या योग्य शेड नुसार फाउंडेशन निवडावा.
3. जास्त प्रमाणात मेकअप लावणे
जास्त मेकअप केला म्हणजे चेहरा अधिक सुंदर दिसेल, असा अनेकांचा समज असतो. मात्र, प्रत्यक्षात प्रमाणापेक्षा जास्त फाउंडेशन, कन्सीलर किंवा कॉम्पॅक्ट पावडर वापरल्यास मेकअप केकी दिसू शकतो.डोळ्यांखाली जास्त कन्सीलर लावल्यास ते सुरकुत्यांमध्ये जमा होते आणि मेकअप खराब दिसू शकतो. तसेच चेहऱ्यावर अधिक पावडर वापरल्यास त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसण्याची शक्यता असते. चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी अनेक जणी वारंवार फाउंडेशन लावतात. पण, जास्त फाउंडेशन लावल्याने डाग लपण्याऐवजी चेहरा असमान आणि मेकअपचा थर जाड दिसू शकतो. यासाठी चेहऱ्यावर आवश्यक एवढाच मेकअप करावा.
4. घाणेरडे मेकअप ब्रश वापरणे
मेकअप करताना बहुतांश लोक फाउंडेशन, लिपस्टिक आणि इतर प्रॉडक्ट्सवर लक्ष देतात. पण, मेकअपसाठी वापरले जाणारे ब्रश आणि स्पंज स्वच्छ आहेत का, याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. एकच ब्रश किंवा स्पंज वारंवार वापरल्यामुळे त्यावर मेकअपचे थर, चेहऱ्यावरील तेल, घाण आणि जंतू जमा होऊ शकतात. असे अस्वच्छ ब्रश आणि स्पंज वापरल्याने चेहऱ्यावर मुरुम येणे, खाज सुटणे, त्वचेची जळजळ होणे किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका वाढू शकतो. मेकअप स्पंज वापरल्यानंतर तो ओलसर ठेवला, तर त्यामध्ये जंतू वाढू शकतात. त्यामुळे मेकअपचे ब्रश आणि स्पंज नियमितपणे स्वच्छ धुणे आणि पूर्णपणे वाळवणे गरजेचे आहे.
5. मेकअप न काढताच झोपणे
दिवसभर काम केल्यानंतर थकव्यामुळे अनेक जणी मेकअप न काढताच झोपतात. मात्र, ही सवय त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकते. दिवसभर चेहऱ्यावर मेकअपसोबत धूळ, घाण, घाम आणि तेल जमा होत असते. त्यामुळे खाज सुटणे किंवा त्वचेची जळजळ होणे अशा समस्या होऊ शकतात. मस्कारा आणि आयलाइनर न काढता झोपल्यास डोळ्यांभोवती जळजळ किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते. म्हणून झोपण्यापूर्वी मेकअप पूर्णपणे काढून चेहरा स्वच्छ धुणं महत्त्वाचं आहे.
मेकअप ही केवळ सुंदर दिसण्याची पद्धत नसून स्वतःचा लूक अधिक खुलवण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे मॉइश्चरायझरचा वापर, योग्य फाउंडेशनची निवडणे, मर्यादित मेकअप, स्वच्छ ब्रश आणि रात्री मेकअप काढण्याची सवय या पाच गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचा मेकअप अधिक नैसर्गिक, आकर्षक दिसू शकतो.