मनोज जरांगे पाटलांची पुन्हा प्रकृती बिघडली; रुग्णालयातून डिस्चार्जनंतर ताप आणि अशक्तपणा, मराठवाडा दौरा रद्द
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा प्रकृती बिघडली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयातून कालच डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागला. त्यामुळे अंतरवाली सराटी येथे त्यांच्यावर सलाईनद्वारे उपचार सुरू करण्यात आले असून, प्रस्तावित मराठवाडा दौराही रद्द करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा चिंताजनक बातमी समोर आली आहे. कालच छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज अचानक त्यांची तब्येत पुन्हा बिघडली आहे. ताप आणि अशक्तपणा जाणवत असल्याने अंतरवाली सराटी येथे त्यांच्यावर सलाईनद्वारे उपचार सुरू करण्यात आले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी प्रस्तावित मराठवाडा दौराही रद्द केला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यानंतर बिघडली होती प्रकृती
मनोज जरांगे पाटील यांनी 8 ऑगस्ट ते 13 ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये इशारा बैठका घेतल्या तसेच विविध गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधला.
या दौऱ्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान मराठा आरक्षणासंदर्भातील अभ्यासकांच्या बैठकीसाठी ते काही काळ अंतरवाली सराटी येथे आले होते. बैठक झाल्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर कालच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
डिस्चार्जनंतर पुन्हा ताप आणि अशक्तपणा
मात्र, अंतरवाली सराटी येथे परतल्यानंतर आज पुन्हा त्यांना अशक्तपणा आणि ताप जाणवू लागला. त्यामुळे स्थानिक पातळीवर तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, वारंवार उपोषण आणि आंदोलनामुळे जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना आमरण उपोषण टाळण्याचा सल्ला दिला असला तरी ते आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जाते.
29 ऑगस्टपासून पुढील लढ्याची घोषणा
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून पुढील लढा सुरू करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र, त्याआधीच त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.
सध्या अंतरवाली सराटी येथे त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील अपडेटकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.