पतीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये लपवला; तब्बल 9 वर्षांनंतर पत्नीला जन्मठेप
पंजाबमधील मोहाली येथे २०१७ मध्ये घडलेल्या उद्योगपती एकम सिंग धिल्लों हत्याप्रकरणी तब्बल नऊ वर्षांनंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पत्नी सीरत कौरला पतीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुरावे नष्ट करणे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे या आरोपांमध्येही तिला स्वतंत्र शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणात दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलाची साक्ष निर्णायक ठरली.

पंजाबमधील Mohali येथे २०१७ मध्ये घडलेल्या उद्योगपती एकम सिंग धिल्लों यांच्या हत्येप्रकरणी तब्बल नऊ वर्षांनंतर न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. मोहाली न्यायालयाने पत्नी सीरत कौर (वय ४४) हिला पतीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाने खुनाच्या आरोपाखेरीज पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याबद्दलही सीरत कौरला प्रत्येकी तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच तिच्यावर ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सर्व शिक्षा एकाचवेळी (Concurrent) भोगाव्या लागणार आहेत.
2017 मध्ये घडली होती धक्कादायक घटना
१८ आणि १९ मार्च २०१७ च्या मध्यरात्री ही हत्या झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर ४० वर्षीय उद्योगपती एकम सिंग धिल्लों यांचा मृतदेह त्यांच्या भाड्याच्या घराबाहेर उभ्या असलेल्या BMW कारच्या मागील सीटवर एका सुटकेसमध्ये आढळून आला होता.
मृताचे भाऊ दर्शन सिंग धिल्लों यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एखादी अनुचित घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. तेव्हा घराबाहेर उभी असलेल्या कारच्या मागील दरवाजाजवळ रक्ताचे डाग दिसले. पोलिसांनी कारमधील सुटकेस उघडल्यानंतर त्यामध्ये एकम सिंग धिल्लों यांचा मृतदेह आढळला, लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
मुलाची साक्ष ठरली महत्त्वाची
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दाम्पत्याचा मुलगा गुरनिवाज सिंग याची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. घटना घडली तेव्हा तो अवघा ११ वर्षांचा होता.
न्यायालयात दिलेल्या साक्षीत त्याने सांगितले की, घटनेच्या रात्री त्याने आईला घरातील लॉकरमधून पिस्तूल काढताना पाहिले होते. त्याआधी आई-वडिलांमध्ये 'निमरत' नावाच्या व्यक्तीवरून वाद झाला होता. काही वेळानंतर त्याला वडिलांची किंकाळी आणि त्यानंतर गोळीबाराचा आवाज ऐकू आला. मात्र त्या वेळी त्याला दुसऱ्या खोलीत बाहेरून कोंडून ठेवण्यात आले होते, असेही त्याने सांगितले.
पत्नीचा बचावाचा दावा
२०१७ मध्ये अटकेनंतर सीरत कौरने पोलिसांसमोर स्वसंरक्षणासाठी गोळी झाडल्याचा दावा केला होता. तसेच तिने लाई डिटेक्टर (Lie Detector) चाचणी करण्यास नकार देत, गोळी झाडल्याची कबुली आधीच दिल्याचे न्यायालयाला सांगितले होते.
मालमत्तेसाठी हत्या केल्याचा आरोप
सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, पतीच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने सीरत कौरने ही हत्या केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने सादर करण्यात आलेले साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक पुरावे आणि इतर परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत तिला दोषी ठरवले.
या निकालामुळे जवळपास नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या बहुचर्चित हत्याकांडाचा न्यायालयीन अध्याय संपला आहे.