लिफ्टच्या देखभालीकडे दुर्लक्ष ठरले जीवघेणे! कुर्ल्यातील 11 वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
मुंबईतील कुर्ला पूर्व येथील शमीम टॉवरमध्ये लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून 11 वर्षीय झैन तहसीदारचा मृत्यू झाल्याप्रकरणी तीन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सोसायटीचे अध्यक्ष तौफिक अस्फाक खान, सचिव आसिफ मन्सूर खान आणि खजिनदार मोला युसेन पटेल यांच्याविरोधात नेहरू नगर पोलिसांनी FIR दाखल केली आहे. विद्युत निरीक्षकांच्या अहवालात लिफ्ट तांत्रिकदृष्ट्या वापरण्यास अयोग्य असल्याचे आणि अधिकृत कंत्राटदाराकडून देखभाल केली जात नसल्याचे समोर आले आहे.

मुंबई : मुंबईतील कुर्ला पूर्व येथील शमीम टॉवरमधील लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी तीन महिन्यांच्या तपासानंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून 11 वर्षीय झैन तहसीदार याचा मृत्यू झाल्याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांच्याविरोधात नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लिफ्टच्या देखभालीत हलगर्जीपणा झाल्याचे विद्युत निरीक्षकांच्या अहवालातून समोर आले आहे.
पोलिसांनी सोसायटीचे अध्यक्ष तौफिक अस्फाक खान (52), सचिव आसिफ मन्सूर खान (50) आणि खजिनदार मोला युसेन पटेल (60) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 106(1), 125, 289 आणि 3(5) अंतर्गत FIR नोंदवली आहे.
नेमकी कशी घडली दुर्घटना?
ही घटना 6 जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कुर्ला पूर्वेतील जागृती नगर परिसरातील शमीम टॉवरच्या बिल्डिंग क्रमांक 2 मधील बी विंगमध्ये घडली. 11 वर्षीय झैन तहसीदार दहाव्या मजल्यावरील पॅसेजमध्ये इतर मुलांसोबत खेळत होता. यावेळी अचानक लिफ्टचा दरवाजा उघडल्याने झैनचा तोल गेला आणि तो थेट लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडला.
तिसऱ्या मजल्यावर थांबलेल्या लिफ्टच्या केबिनच्या छतावर तो आदळला. या दुर्घटनेत झैन गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि रहिवाशांनी मदतीने त्याला बाहेर काढून सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री सुमारे 10:40 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
विद्युत निरीक्षकांच्या अहवालात धक्कादायक माहिती
अपघातानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान विद्युत निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालात लिफ्ट क्रमांक 02 तांत्रिकदृष्ट्या वापरण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले.
महाराष्ट्र लिफ्ट कायद्यानुसार लिफ्टची देखभाल आणि दुरुस्ती अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून होणे आवश्यक होते. मात्र, सोसायटीने अशा कोणत्याही अधिकृत कंत्राटदाराची नियुक्ती केली नव्हती. लिफ्टच्या देखभाल आणि दुरुस्तीमधील त्रुटी अपघातास कारणीभूत ठरल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
रहिवाशांनी यापूर्वीही केल्या होत्या तक्रारी
एफआयआरमधील माहितीनुसार, बी विंगमधील लिफ्ट क्रमांक 02 मध्ये यापूर्वीपासूनच तांत्रिक बिघाड होता. विशेष म्हणजे, लिफ्ट दहाव्या मजल्यावर थांबत नसल्याने तेथील रहिवाशांना नवव्या किंवा अकराव्या मजल्यावरून लिफ्ट पकडावी लागत होती.
या समस्येबाबत रहिवाशांनी सोसायटीच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांकडे अनेकदा तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच लिफ्टच्या दुरुस्तीसाठी पात्र आणि परवानाधारक कंत्राटदाराची नियुक्तीही करण्यात आली नव्हती.
तीन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांची कारवाई
या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वैभसे यांनी 29 ऑक्टोबर 2026 रोजी झैनचे वडील जमीर तहसीदार आणि आई फजिला यांना नेहरू नगर पोलीस ठाण्यात बोलावले होते. तपासादरम्यान गोळा करण्यात आलेले पुरावे आणि कागदपत्रे कुटुंबीयांना दाखवण्यात आली.
त्यानंतर कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे सोसायटीच्या तीन पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे इमारतींमधील लिफ्टची सुरक्षितता, नियमित देखभाल आणि सोसायटी व्यवस्थापनाच्या जबाबदारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे