मुंबई लोकलचा मोठा खोळंबा अन् तरुणाचा दुर्दैवी मृत्यू! भांडुपमध्ये रेल्वेच्या धडकेत २१ वर्षीय साहिलचा बळी

मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने सोमवारी लोकल सेवा अनेक तास विस्कळीत झाली. प्रवाशांना रेल्वे रुळांवरून चालत जावे लागले. दरम्यान, भांडुप स्थानकाजवळ लोकलच्या धडकेत २१ वर्षीय साहिल थिटे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

train_accident

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले. कांजूरमार्ग परिसरातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ठाणे ते सीएसएमटी मार्गावरील लोकल सेवा अनेक तास प्रभावित झाली. याचदरम्यान भांडुप रेल्वे स्थानकाजवळ लोकलच्या धडकेत २१ वर्षीय साहिल थिटे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. साहिल हा मुलुंड कॉलनीतील अमर नगर परिसरात राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ४ वरून फलाट क्रमांक ३ वरील लोकल पकडण्यासाठी जात असताना साहिलला लोकलची धडक बसली. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सिग्नल केबिनमध्ये आग; प्रवासी रुळांवर उतरले

सोमवारी सकाळी विक्रोळी आणि भांडुपदरम्यान सिग्नलिंग यंत्रणेच्या रिले रूममध्ये आग लागल्याने लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक गाड्या एकाच ठिकाणी थांबल्याने प्रवासी तीन ते चार तास अडकून पडले. काही प्रवाशांनी रेल्वे रुळांवरून चालत जवळचे स्थानक गाठले. त्यानंतर बस, रिक्षा आणि कॅबच्या मदतीने कार्यालय गाठण्याचा प्रयत्न केला.

सायंकाळपर्यंतही वाहतूक विस्कळीत

रेल्वे प्रशासनाने सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले. उपलब्ध माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजेपर्यंत चारपैकी तीन मार्गिकांवरील सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्यात आली होती. मात्र, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील दुरुस्तीचे काम सुरू होते.

या तांत्रिक बिघाडामुळे सकाळपासूनच लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. दुसरीकडे, भांडुपमधील तरुणाच्या मृत्यूमुळे या दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Inline Article Ad 728x90