नांदेडमध्ये बंदी असलेली पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने जप्त; ५० ते ६० लाखांचा साठा हस्तगत

नांदेडमध्ये पोलिस आणि FDA च्या संयुक्त कारवाईत ५० ते ६० लाख रुपये किमतीची बंदी असलेली पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली. दुकान मालकाला ताब्यात घेण्यात आले असून, उत्पादनांच्या स्रोताचा आणि इतर संबंधितांचा तपास सुरू आहे.

नांदेड Image


नांदेड: नांदेड पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी संयुक्त कारवाई करत बंदी असलेल्या पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत अंदाजे ५० ते ६० लाख रुपये किमतीची सौंदर्यप्रसाधने हस्तगत करण्यात आली असून, या प्रकरणी एका दुकान मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मन्यार गल्ली परिसरातील एका दुकानावर आणि त्यासोबतच गोदामावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान ३८ प्रकारची सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, ही उत्पादने भारतात विक्रीसाठी बंदी असलेली असल्याचा संशय आहे.

तपासादरम्यान ही उत्पादने टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायाच्या आडून राज्यातील विविध भागांत विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या सर्व उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या सौंदर्यप्रसाधनांमध्ये आरोग्यास अपायकारक किंवा बंदी असलेले रासायनिक घटक आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. तपास अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, ही उत्पादने भारतात नेमकी कशी पोहोचली, ती कोणाकडून आणली गेली, त्यामागे तस्करीचे रॅकेट आहे का आणि या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास नांदेड पोलिस आणि FDA संयुक्तपणे करत आहेत. या कारवाईमुळे बेकायदेशीररीत्या विकल्या जाणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Inline Article Ad 728x90