नांदेडमध्ये तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; चॉकलेटचे आमिष दाखवून नेले, संशयित फरार

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून तिला सोबत नेण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी पोक्सो कायद्यासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sexual assault on a minor girl

नांदेड : राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना सुरूच असताना नांदेड जिल्ह्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून तिला सोबत नेण्यात आल्याची माहिती आहे.

सोमवारी (24 ऑगस्ट) सायंकाळी पीडित चिमुकली घरासमोरील अंगणात खेळत होती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या नातेवाईक व्यक्तीने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून सोबत नेले. सुमारे 20 ते 25 मिनिटांनंतर तो तिला घरी सोडून निघून गेला. त्यानंतर चिमुकली रडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. आईने विचारपूस केल्यानंतर मुलीने संबंधित व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचे सांगितले.

चिमुकलीला दुखापत झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकांनी तिला तातडीने नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून मंगळवारी (25 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास संशयिताविरोधात पोक्सो कायद्यासह अन्य संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेनंतर संशयित फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Inline Article Ad 728x90