नोएड्यात एकाकी वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू; तीन दिवस फ्लॅटमध्येच पडून होता मृतदेह
उत्तर प्रदेशातील नोएडाच्या अम्रपाली सिलिकॉन सिटी सोसायटीमध्ये ६८ वर्षीय राजीव अरोरा यांचा फ्लॅटमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर तीन दिवस त्यांचा मृतदेह घरातच पडून होता. दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक तपासात ते एकटे राहत होते आणि आर्थिक तणावात असल्याची माहिती समोर आली असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
.png)
उत्तर प्रदेशातील नोएडाच्या अम्रपाली सिलिकॉन सिटी सोसायटीमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ६८ वर्षीय राजीव अरोरा यांचा त्यांच्या ११व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल तीन दिवस त्यांचा मृतदेह फ्लॅटमध्येच पडून होता. फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता राजीव अरोरा यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. प्राथमिक तपास सुरू असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
तपासादरम्यान राजीव अरोरा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही महत्त्वाची माहितीही समोर आली आहे. ते फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. त्यांचा मुलगा लंडनमध्ये, तर मुलगी इंडोनेशियातील बाली येथे वास्तव्यास आहे. त्यामुळे त्यांची नियमित विचारपूस करणारे किंवा त्यांच्यासोबत राहणारे कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची माहितीही अनेक दिवस कोणालाच मिळाली नाही.
पोलीस तपासात असेही समोर आले आहे की, गेल्या काही काळात शेअर बाजारात मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे राजीव अरोरा मानसिक तणावाखाली होते. त्याचबरोबर घरभाडे, वीज बिल आणि इतर खर्च थकल्यामुळे घरमालकाशी त्यांचे वाद सुरू होते. या सर्व बाबींचा तपास पोलीस करत असून, त्यांच्या मृत्यूमागे इतर कोणते कारण आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
ही घटना मोठ्या शहरांमधील बदलत्या जीवनशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक मुलं परदेशात किंवा दुसऱ्या शहरात असल्यामुळे एकटे राहतात. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची आणि नियमित संपर्काची गरज किती महत्त्वाची आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला असून शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.