पुण्याच्या अर्जुन हरगुडेची भारतीय कनिष्ठ हॉकी संघात निवड; बेल्जियम दौऱ्यासाठी मिळाले भारतीय संघात स्थान

हवेली तालुक्यातील केसनंद गावचा सुपुत्र अर्जुन हरगुडे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार; गावासह पुणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

sports news

पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील केसनंद गावचा युवा हॉकीपटू अर्जुन हरगुडे याची आगामी बेल्जियम दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २२ सदस्यीय भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघात निवड झाली आहे. ५ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत होणाऱ्या या दौऱ्यात अर्जुन भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, त्याच्या निवडीमुळे केसनंद गावासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच भारतीय हॉकी महासंघाने बेल्जियम दौऱ्यासाठी भारतीय कनिष्ठ संघाची घोषणा केली. मुख्य प्रशिक्षक फ्रेडरिक सोयेझ यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाचा हा महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे. या दौऱ्यात भारताचा संघ ऑस्ट्रिया, बेल्जियम, जर्मनी आणि नेदरलँड्स या बलाढ्य संघांविरुद्ध सामने खेळणार आहे.

अर्जुन हरगुडे याने लहानपणापासूनच हॉकीमध्ये सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले असून, ही केवळ त्याच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. केसनंद गावातील नागरिक, कुटुंबीय आणि क्रीडाप्रेमींनी अर्जुनच्या निवडीचे उत्साहात स्वागत केले आहे.

अर्जुन हरगुडे हा फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेचा विद्यार्थी असून, त्याच्या क्रीडा कारकिर्दीची सुरुवात याच संस्थेतून झाली. माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या लोकसेवा प्रतिष्ठान संचलित या संस्थेत अर्जुनने हॉकीचे प्राथमिक धडे घेतले. आज तो राष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला असून, भविष्यात भारतीय वरिष्ठ संघाचेही नेतृत्व करण्याची क्षमता त्याच्यात असल्याचा विश्वास क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉकीपटू धनराज पिल्ले आणि विक्रम पिल्ले यांच्यानंतर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा अर्जुन हा राज्यातील आणखी एक आश्वासक खेळाडू ठरला आहे. त्याला हॉकी महाराष्ट्रचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, त्याच्या या यशामागे कुटुंबीयांचे आणि प्रशिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.

बेल्जियम दौऱ्यामध्ये भारतीय कनिष्ठ संघाचा सामना युरोपमधील बलाढ्य संघांशी होणार असल्याने अर्जुनला आंतरराष्ट्रीय स्तरावरील मौल्यवान अनुभव मिळणार आहे. या अनुभवाच्या जोरावर तो भारतीय संघातील आपले स्थान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असून, महाराष्ट्रासह देशातील क्रीडाप्रेमींना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

अर्जुन हरगुडेच्या या यशामुळे केसनंद गावासह पुणे जिल्ह्याचा मान उंचावला असून, तो दौऱ्यावरून परतल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


Inline Article Ad 728x90