पुण्यात दिवाळीत आगीचे तांडव! अवघ्या १० तासांत ८१ ठिकाणी आग; अग्निशमन दलाची धावपळ
पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे अवघ्या १० तासांत आगीच्या तब्बल ८१ वर्दी अग्निशमन दलाकडे प्राप्त झाल्या. कोंढवा, कोथरूड, खराडी, कात्रज, धायरीसह शहरातील विविध भागांत घरं, दुकानं, गोडाऊन, वाहनं आणि झाडांना आग लागल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अग्निशमन दलाची रात्रभर धावपळ उडाली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

पुणे : दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यात फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. दुपारी ३ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत अवघ्या १० तासांत पुणे अग्निशमन दलाकडे तब्बल ८१ आगीच्या वर्दी प्राप्त झाल्या. शहरातील विविध भागांत घरं, दुकानं, गोडाऊन, वाहनं, झाडं आणि मोकळ्या जागेतील गवताला आग लागल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणी जखमी झाल्याची नोंद नाही.
लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळपासून शहरात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. त्यानंतर अग्निशमन दलाकडे आगीच्या वर्दी येण्याचे प्रमाण वाढले. कोंढवा, कोथरूड, खराडी, कात्रज, धायरी, औंध, विमाननगर, वारजे, सिंहगड रोड आणि शहराच्या मध्यवर्ती भागांत आगीच्या घटना नोंदवण्यात आल्या.
घरं, दुकानं आणि गोडाऊनला आगीची झळ
खराडी परिसरात मुंढवा पुलाजवळील इमारतीमधील फ्लॅटला, तसेच एचपी पेट्रोल पंपामागील इमारतीतील फ्लॅटला आग लागल्याची नोंद झाली. कोंढव्यात इस्कॉन मंदिराजवळ आणि लुल्लानगर परिसरातील फ्लॅटमध्येही आग लागली. विमाननगरमधील एअरपोर्ट रोडवरील इमारतीत आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली.
याशिवाय फुरसुंगी, कात्रज-आंबेगाव आणि वारजे कॅनॉल रोड परिसरातील गोडाऊनमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या. दगडूशेठ मंदिराजवळील समाधान चौक, सातारा रोडवरील सोनावणे इंडस्ट्रीज आणि मंगळवार पेठेतील दुकानांनाही आगीची झळ बसली.
झाडं, गवत आणि वाहनांनाही आग
शहरातील अनेक भागांत फटाक्यांमुळे झाडं, गवत आणि कचऱ्याला आग लागल्याच्या वर्दी प्राप्त झाल्या. कोथरूड, टिंगरेनगर, औंध, कात्रज, शिवाजीनगर, पाषाण आणि धायरी परिसरात झाडांना आग लागली. तर बालेवाडी, कर्वेनगर, धनकवडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात मोकळ्या जागेतील गवताला आग लागल्याच्या घटना घडल्या.
सिंहगड रोडवरील माणिकबाग आणि धायरीतील रायकर मळा परिसरात वाहनांना आग लागल्याची नोंद झाली. औंध गावात इलेक्ट्रिक डीपीला, तर कल्याणीनगरमधील सोसायटीत केबलला आग लागल्याची वर्दी मिळाली.
अग्निशमन दलाची रात्रभर धावपळ
लक्ष्मीपूजनाच्या रात्री एकामागोमाग एक आगीच्या वर्दी येत असल्याने अग्निशमन दलाची मोठी धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत शहराच्या विविध भागांत आगीच्या घटना सुरूच होत्या. मध्यरात्रीनंतरही हडपसर, कोंढवा, धायरी, येरवडा आणि सहकारनगर परिसरातून आगीच्या वर्दी प्राप्त झाल्या.
अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, एकूण ८१ आगीच्या वर्दी नोंदवण्यात आल्या. मात्र, या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे.