मर्चंट नेव्हीच्या जहाजावर हल्ला; पुण्याचा अभियंता हेरंब करमरकर ठार

होमुर्झच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील मर्चंट नेव्हीचे अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. ते एम.व्ही. जीएफएस गॅलेक्सी जहाजावर कार्यरत होते. हल्ल्यानंतर २४ पैकी २३ कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. मृत्यूपूर्वी काही मिनिटे आधी त्यांनी कुटुंबीयांशी शेवटचा फोनवर संवाद साधला होता.

हेरंब करमरकर Image

होमुर्झच्या सामुद्रधुनीजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील मर्चंट नेव्हीचे अभियंता हेरंब करमरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पुणे शहरासह संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. ते एम.व्ही. जीएफएस गॅलेक्सी (MV GFS Galaxy) या व्यापारी जहाजावर सेवा बजावत होते. रविवारी पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास हे जहाज ओमानच्या सागरी हद्दीतून प्रवास करत असताना त्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली. हल्ल्यामुळे जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली.

या जहाजावर एकूण २४ कर्मचारी कार्यरत होते. हल्ल्यानंतर बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आणि २३ कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. मात्र, हेरंब करमरकर यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे, हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वी म्हणजे रात्री २.५० वाजता हेरंब यांनी आपल्या कुटुंबीयांशी शेवटचा फोनवर संवाद साधला होता. त्यावेळी सर्व काही सुरळीत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच जहाजावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

या घटनेची माहिती सोमवारी हेरंब करमरकर यांचे नातेवाईक रवींद्र टंडन यांना देण्यात आली. त्यांच्या पार्थिवाला भारतात आणण्यासाठी आणि पुढील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.

हेरंब करमरकर यांच्या निधनामुळे पुणे शहरात शोककळा पसरली असून मित्रपरिवार, नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांप्रती सर्व स्तरातून संवेदना व्यक्त करण्यात येत असून या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

Inline Article Ad 728x90