पुण्यात ५०० हून अधिक पडद्यामागील कलावंतांची दिवाळी गोड; मुकेश ऋषी, प्रवीण तरडे यांची उपस्थिती
पुण्यात भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र आणि मुरलीधर मोहोळ मित्र परिवाराच्या वतीने चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये पडद्यामागे काम करणाऱ्या ५०० हून अधिक कलावंतांना दिवाळी सरंजामाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला अभिनेते मुकेश ऋषी, लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासह अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली.
पुणे : चित्रपट, नाटक आणि मालिकांच्या यशामागे पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांसोबतच तंत्रज्ञ, स्पॉटबॉय आणि इतर कामगारांचेही मोठे योगदान असते. याच पडद्यामागील कलावंतांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी पुण्यात विशेष दिवाळी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र आणि मा. मुरलीधर अण्णा मोहोळ मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील ५०० हून अधिक पडद्यामागील कलावंतांना दिवाळी सरंजामाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात अभिनेते मुकेश ऋषी

आणि प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे
यांच्या हस्ते कलावंतांना दिवाळी भेट देण्यात आली. यावेळी हार्दिक जोशी,
देवेंद्र गायकवाड, अक्षय टंकसाळे, किरण गायकवाड, अतुल कुदळे आणि धनंजय पोवार (डीपी दादा)
यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. तसेच आगामी 'जय श्री राम' चित्रपटाच्या कलाकारांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.
या उपक्रमाचे आयोजन भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा अभिनेते रमेश परदेशी (पिट्या भाई) यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश सुपेकर, चेतन धोत्रे, आनंद कुंदुर, सागर पाठक, ऋतुजा शिरोडे, कृणाल कडू, अक्षय वाडकर, करण सुरवसे, सुनील पालकर आणि समाधान कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमाला नगरसेवक निलेश कोंढाळकर आणि सामाजिक कार्यकर्ते नवनाथ जाधव यांचेही सहकार्य लाभले. पडद्यामागे मेहनत करणाऱ्या कलावंतांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.