राज ठाकरेंचा आशिष शेलारांना मिश्किल टोला; ‘2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं!’
‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मंत्री आशिष शेलार यांना मिश्किल टोला लगावला. ‘2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं,’ या राज ठाकरेंच्या विधानाने उपस्थितांमध्ये हशा पिकला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे आपल्या मिश्किल शैलीतील वक्तव्यांसाठी ओळखले जातात. मुंबईत आयोजित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातही त्यांच्या विनोदी टिप्पणीने उपस्थितांमध्ये हशा पिकला. मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मिश्किल टोला लगावला. ‘2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं,’ असं म्हणत त्यांनी शेलार यांना चिमटा काढला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा’; राज ठाकरेंच्या विधानाने हशा
कार्यक्रमात भाषण करताना राज ठाकरे यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा उल्लेख केला. यावेळी आशिष शेलार यांच्या विधानाचा संदर्भ देत ते म्हणाले की, शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना, राज ठाकरे यांनी बोलावलं की मुख्यमंत्री येतात, असं म्हटलं होतं.
यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, “आशिष शेलार यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना बोलावलं की मुख्यमंत्री येतात. याच्यापुढे बोलवत जाईन आणि ते येत जातील, असं त्यांचं म्हणणं आहे. 2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं. अजून काही सांगू मी?”
राज ठाकरेंच्या या मिश्किल टिप्पणीने कार्यक्रमात हशा पिकला.
बाळासाहेब ठाकरे मला ‘टिनू’ म्हणायचे
या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रकलेच्या प्रवासालाही उजाळा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांना लाडाने ‘टिनू’ म्हणत असत, अशी आठवण त्यांनी सांगितली.
1979 मध्ये आपलं पहिलं व्यंगचित्र प्रसिद्ध झालं होतं. त्याचं शीर्षक ‘आमच्या टिनूनं चितारलेलं उद्याचं चित्र’ असं होतं, असं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांचा ऑईल पेंटिंग आणि चित्रकलेतील हात उत्तम होता, तर व्यंगचित्रकलेची आवड आपल्याला होती, असंही राज ठाकरे म्हणाले.
जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये तीन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर आपण ते सोडून दिलं. त्यामुळे आपण पदवीधर नसलो, तरी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उभं राहू शकतो, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
पदवीधर मतदारसंघाच्या फॉर्मवरही राज ठाकरेंची टिप्पणी
राज ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर यांच्याशी संबंधित एक आठवणही सांगितली. नवलकर यांनी पूर्वी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा फॉर्म दाखवला होता. त्या फॉर्मवर ‘उमेदवारीची सही अथवा अंगठा’ असं लिहिलं होतं, असं त्यांनी नमूद केलं.
या उल्लेखावरून राज ठाकरे यांनी लोकशाहीतील विसंगतीवर मिश्किल भाष्य केलं. तो फॉर्म म्हणजेच एक व्यंगचित्र होतं, असं ते म्हणाले.
काय म्हणाले होते आशिष शेलार?
यापूर्वी भाषण करताना मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून, “उद्धवजी, तुम्ही समजून घ्या, राज ठाकरे बोलल्यावर मुख्यमंत्री येतात,” असं म्हटलं होतं. तसेच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना बोलवत राहावं आणि उद्धव ठाकरे व आपल्यालाही बोलवत राहावं, अशी टिप्पणी शेलार यांनी केली होती.
याच विधानाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी 2029 चा उल्लेख करत उपस्थितांना हसवलं.
‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तकात व्यंगचित्रांचा खजिना
‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ हे पुस्तक प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलं आहे. गेल्या शंभर वर्षांतील मराठीतील प्रख्यात व्यंगचित्रकारांचा परिचय आणि त्यांच्या निवडक व्यंगचित्रांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. ग्रंथाली प्रकाशनातर्फे या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.
व्यंगचित्रकलेचा इतिहास, मराठीतील नामवंत व्यंगचित्रकारांचं योगदान आणि राजकीय-सामाजिक विषयांवरील व्यंगचित्रांची परंपरा यांना या पुस्तकातून उजाळा मिळतो.