वृक्षतोडीवरून महायुती सरकारविरोधात जरांगे पाटील आक्रमक! 'इंग्रजांपेक्षाही जास्त त्रास' म्हणत थेट हल्लाबोल!
कर्जत-भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आदित्य ठाकरेंपाठोपाठ आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. २८ ऑक्टोबर रोजी साय डोंगर परिसराला भेट देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून, सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई : कर्जत-भीमाशंकर परिसरातील साय डोंगर येथे सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर आता राजकीय नेतेही आक्रमक झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या परिसराची पाहणी केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही वृक्षतोडीविरोधात भूमिका घेतली आहे.
मनोज जरांगे पाटील येत्या बुधवारी, २८ ऑक्टोबर रोजी कर्जत-भीमाशंकरमधील साय डोंगर परिसराला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते स्थानिक नागरिकांशी संवाद साधून वृक्षतोडीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेणार आहेत.
'इंग्रजांपेक्षाही जास्त त्रास'; जरांगे पाटलांचा सरकारवर हल्लाबोल
वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. एकीकडे कोट्यवधी झाडे लावण्याच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे जंगलतोड करायची, हा विरोधाभास असल्याचे त्यांनी म्हटले.
सरकारने जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. मात्र, सरकारची वाटचाल दंडेलशाहीच्या दिशेने सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, पूर्वी इंग्रजांकडून जेवढा त्रास होत नव्हता, त्यापेक्षा जास्त त्रास सध्याच्या सरकारकडून होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
२८ ऑक्टोबरला साय डोंगर परिसरात भेट
जरांगे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील. अंतरवाली आंदोलनात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासह केज तालुक्यातील धार्मिक कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर अहिल्यानगरमार्गे २८ ऑक्टोबर रोजी साय डोंगर परिसरात पोहोचणार आहेत.
आदित्य ठाकरेंचाही वृक्षतोडीला तीव्र विरोध
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी साय डोंगर परिसराला भेट देत स्थानिक नागरिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. महाराष्ट्राच्या नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी वृक्षतोडीविरोधातील लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही या वृक्षतोडीवरून सरकारला धारेवर धरले आहे. आधीच पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी अडचणीत असताना विकासाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. सरकारने वृक्षतोड तातडीने थांबवावी, अन्यथा जनतेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कर्जत-भीमाशंकरमधील प्रस्तावित ऊर्जा प्रकल्प आणि त्यासाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरून स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि राजकीय नेत्यांमध्ये विरोध वाढत आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित दौऱ्यामुळे या आंदोलनाला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.