खाकी की राजकीय निष्ठा? राज ठाकरेंच्या ‘त्या’ आक्रमक पत्रावर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचे सडेतोड उत्तर!
मुंबई/नागपूर:महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात सध्या एका मोठ्या वादाने तोंड वर काढले आहे. डॅशिंग आयपीएस अधिकारी आणि नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय ठिणगी पडली. या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांगरे पाटील यांच्यावर अत्यंत खोचक आणि आक्रमक शब्दांत टीका केली होती. आता या संपूर्ण वादावर स्वतः विश्वास नांगरे पाटील यांनी अधिकृतपणे मौन सोडत टीकाकारांना थेट आणि रोखठोक उत्तर दिले आहे.
Sakshi Megha Prabhuवाद नेमका काय आहे?
काही दिवसांपूर्वीच विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी (Nagpur CP) नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर, त्यांचे 'सकल हिंदू समाज' संमेलनातील एक भाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शिस्तीचे आणि संस्थापकांच्या राष्ट्रकार्याचे जाहीर कौतुक करताना दिसले. शासकीय सेवेतील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने अशा प्रकारे उघडपणे संघाची स्तुती केल्यामुळे त्यांच्या प्रशासकीय निष्पक्षतेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
"राजीनामा द्या आणि संघात जा!" – राज ठाकरेंचा थेट प्रहार
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर विश्वास नांगरे पाटील आणि राज्यातील महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.

खाकीचा रंग बदलला? "आतापर्यंत आम्हाला वाटत होते की, पोलिसांच्या गणवेशातील खाकी रंग हा पोलीस दलाचा आहे. पण तो रंग संघाच्या जुन्या खाकी चड्डीचा रंग आहे, हे आताच कळले," अशी टीका राज ठाकरे ह्यांनी केली
दुहेरी निष्ठा नको: एका पोलीस अधिकाऱ्याची निष्ठा फक्त आणि फक्त त्याच्या कर्तव्याशी असायला हवी, पण इथे नांगरे पाटलांनी दुहेरी निष्ठा दाखवली आहे.
थेट राजीनाम्याची मागणी: जर तुम्हाला संघाबद्दल आणि त्यांच्या विचारसरणीबद्दल इतकीच आपुलकी असेल, तर पोलीस सेवेचा तातडीने राजीनामा द्या आणि अधिकृतपणे भाजप किंवा संघात सामील व्हा.
विवेक गहाण ठेवू नका: नांगरे पाटील हे एक सक्षम अधिकारी आहेत, त्यांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेसमोर गहाण ठेवू नये, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी केले आहे.
विश्वास नांगरे पाटलांचे सडेतोड उत्तर: "माझी बांधिलकी फक्त संविधानाशी!"
ह्या सर्व टीकांनंतर विश्वास नांगरे पाटील ह्यांनी स्वतःचे मत मांडून प्रतिउत्तर दिल आहे. अतिशय संयमी शब्दात त्यांनी जे वक्तव्य केले त्यावरून त्यांच्यावर झालेले आरोप खोटे आहेत ह्याप्रकरचे वक्तव्य केले जात आहे.
"मी एक भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकारी आहे. माझी कटिबद्धता आणि निष्ठा ही फक्त आणि फक्त भारतीय संविधानाशी आणि संविधानाच्या मूल्यांशीच आहे. नागपूर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पावन दीक्षाभूमी आहे आणि आम्ही नेहमीच घटनेच्या मूल्यांचे पाईक राहू." - विश्वास नांगरे पाटील
नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी केवळ हिंदूच नव्हे, तर मुस्लिम समाजाच्या रमजान ईद, इफ्तार पार्ट्या तसेच जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन समाजाच्या सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांनाही तितक्याच आदराने हजेरी लावली आहे. त्यामुळे एका विशिष्ट कार्यक्रमातील वक्तव्यावरून त्यांच्या धर्मनिरपेक्षतेवर शंका घेणे पूर्णपणे अयोग्य आहे. तसेच, त्यांनी कोणत्याही शासकीय आचारसंहितेचा किंवा सेवा नियमांचा भंग केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय वातावरण तापले: काँग्रेसची मध्यस्थि
ह्यामध्ये केवळ मनसेच नाही तर काँग्रेस ने देखील त्यांचे मत नोंदवले आहे ते असे - "संविधानाची शपथ घेऊन जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारायची आणि दुसरीकडे उघडपणे संघाची स्तुती करायची, हा कसला कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी?" असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.
वादाचा निष्कर्ष काय?
विश्वास नांगरे पाटील हे २६/११ च्या मुंबई हल्ल्यादरम्यान शौर्य गाजवणारे आणि राज्यातील एक अत्यंत लोकप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात त्यांची नियुक्ती झाल्याझाल्याच हा वाद पेटल्याने, आगामी काळात पोलीस प्रशासनाची निष्पक्षता आणि राजकीय हस्तक्षेप यावरून महाराष्ट्रात मोठी राजकीय चर्चा रंगणार हे नक्की!