टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ शिक्षक सेनेचे आंदोलन ; सर्व पात्र उमेदवारांना दिलासा देण्याची मागणी

मुंबई : राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्रभरात शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने जोगेश्वरी पूर्व येथील शिक्षण निरीक्षक कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. मुंबईतील विविध शाळांमधील शिक्षकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग नोंदवत पेपरफुटीप्रकरणी सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी केले.

tetSAKSHI MEGHA PRABHU

सीबीआय चौकशीची मागणी; शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्याची मागणी केली. या प्रकरणाचे धागेदोरे राज्याबाहेरील व्यक्तींशी जोडले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने निष्पक्ष आणि व्यापक चौकशी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी वर्षभर शालेय कामकाज, शासकीय जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक अभ्यास यांचा समतोल साधत परीक्षेची तयारी केली होती. मात्र, पेपरफुटीमुळे हजारो उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सर्व पात्र उमेदवारांना न्याय देण्याची मागणी

पेपरफुटीमुळे संपूर्ण परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे सांगत अभ्यंकर यांनी सरकारने विशेष निर्णय घेण्याची मागणी केली. एखाद्या परीक्षेत काही प्रश्न चुकीचे आढळल्यास उमेदवारांना त्या प्रश्नांचे गुण दिले जातात, त्याच धर्तीवर संपूर्ण प्रश्नपत्रिका फुटल्याने पात्र शिक्षकांना न्याय देण्यासाठी विशेष निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शिक्षकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

या प्रकरणात प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगत आमदार अभ्यंकर यांनी संबंधित यंत्रणांनी जबाबदारी निश्चित करावी, असे मत व्यक्त केले. चौकशीनंतर जर यंत्रणेकडून हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट झाले, तर त्याची नैतिक जबाबदारीही स्वीकारली गेली पाहिजे, असे ते म्हणाले. दोषींवर कठोर कारवाई, निष्पक्ष चौकशी आणि प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळावा, हीच आंदोलनाची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Inline Article Ad 728x90