मुंबईत मुसळधार पावसाने दाणादाण; रेड अलर्टमुळे जनजीवन ठप्प

मुंबईसह महानगर प्रदेशात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहराची वाहतूक, रेल्वे सेवा आणि दैनंदिन व्यवहार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी तात्काळ रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 24 ते 48 तास अतिशय संवेदनशील ठरू शकतात, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण किनारपट्टी, गोवा आणि दक्षिण गुजरातमध्येही जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

pausSakshi Megha Prabhu

शाळांना सुट्टी जाहीर

पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळांनाही आजच्या दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक भागांत विक्रमी पावसाची नोंद

मुंबईच्या उपनगरांमध्ये काही ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. खालील भागांत नोंदवलेली पर्जन्यमात्रा विशेष लक्षवेधी ठरली आहे.

  • मुलुंड (Mithagar School) – 230.8 मिमी
  • मानखुर्द (Fire Station) – 228.6 मिमी
  • परळ (F-South Ward) – 223.8 मिमी
  • अंधेरी फायर स्टेशन – 213.2 मिमी
  • सांताक्रूझ वेधशाळा – 165.9 मिमी

या आकडेवारीवरून मुंबईत पावसाचा जोर किती मोठा होता, याची कल्पना येते. काही भागांत पाण्याचा निचरा नीट न झाल्याने सखल भागात तातडीने पाणी साचले.

चेंबूरमध्ये धक्कादायक दुर्घटना

चेंबूर परिसरातील रोड नंबर 11 येथे युनिव्हर्सल हायस्कूलच्या स्कूल व्हॅनवर जुने पिंपळाचे झाड कोसळले. या दुर्दैवी घटनेत विहान श्रीवास्तव (वय 11) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

ही घटना केवळ पावसामुळे झालेली दुर्घटना नसून शहरातील झाडांचे संरक्षण, रस्त्यांचे नियोजन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवरही गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे.

chembur

झाडे कोसळण्यामागचे कारण

महापालिकेच्या प्राथमिक अहवालानुसार, रस्त्यांचे बेसुमार काँक्रिटीकरण ही झाडे कोसळण्यामागील एक महत्त्वाची कारणे मानली जात आहेत. काँक्रिटमुळे झाडांच्या मुळांपर्यंत हवा आणि पाणी पोहोचत नाही. परिणामी मुळे कमकुवत होतात आणि जोरदार पावसात किंवा वाऱ्यात झाडे सहज उन्मळून पडतात.

अधिकाऱ्यांवर कारवाई

चेंबूर दुर्घटनेनंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महापालिकेने एम-वेस्ट वॉर्डमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या घटनेनंतर प्रशासनावर अधिक काटेकोरपणे जबाबदारी स्वीकारण्याचा दबाव वाढला आहे.

रेल्वेसेवेवर परिणाम

दादर स्थानकाजवळ रुळाखालील माती वाहून गेल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा मंदावली आहे. रेल्वे गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रस्ते वाहतूक विस्कळीत

अंधेरी सबवे तब्बल 5 फुटांपर्यंत पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याशिवाय सायन-पनवेल महामार्ग, किंग्ज सर्कल आणि गांधी मार्केट परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.या सगळ्यामुळे सकाळपासून शहरातील अनेक मार्गांवर कोंडी निर्माण झाली असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.

paus 2

विमानसेवेलाही फटका

खराब हवामानाचा परिणाम मुंबई विमानतळावरील उड्डाणांवरही दिसून आला आहे. इंडिगो आणि आकासा एअरच्या काही विमानांना विलंब होत असून प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या फ्लाइटची सद्यस्थिती तपासणे आवश्यक आहे.

नागरिकांसाठी सूचना

प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळावा, समुद्रकिनारी जाऊ नये आणि अधिकृत हवामान सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.

पुढील 24 ते 48 तास मुंबई आणि कोकणासाठी महत्त्वाचे मानले जात असून सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.

Inline Article Ad 728x90