शीतपेयातून गुंगीचं औषध दिल्याचा आरोप; इंजिनिअरिंग विद्यार्थिनीला लॉजवर नेत अत्याचार, दोघांवर गुन्हा
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर परिसरात 20 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन लॉजवर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप असून, ईश्वरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन शीतपेयातून गुंगीचे औषध दिल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ईश्वरपूर पोलिसांनी संबंधित संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील असून सध्या ईश्वरपूर परिसरात राहून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
शीतपेयातून गुंगीचं औषध दिल्याचा आरोप
तक्रारीनुसार, संशयितांनी तरुणीला ईश्वरपूर-कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
घटनेबाबत कोणाला माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली तसेच मारहाणही करण्यात आल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.
पोलिसांत तक्रार; गंभीर कलमांन्वये गुन्हा
या घटनेनंतर पीडितेने ईश्वरपूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयितांविरोधात सामूहिक बलात्कारासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
या प्रकरणात शार्दुल पाटील याच्यासह अन्य एका संशयिताचे नाव समोर आले आहे. संशयितांच्या अटकेची नेमकी स्थिती तसेच घटनेमागील पार्श्वभूमीबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.