एकाच क्षणात दोन एसटींची जोरदार धडक; सांगलीतील अपघाताने खळबळ

सांगलीतील खानापूर तालुक्यातील रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक झाली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 15 ते 16 जण जखमी झाले आहेत. जखमींना विट्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे

Accident

सांगली : खानापूर तालुक्यातील विट्याजवळील रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन ते तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सुमारे 15 ते 16 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विट्याहून जाणारी एसटी बस आणि विजापूरहून मेढ्याकडे निघालेली दुसरी एसटी बस यांची घाटातील वळणावर समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, एका बसचा पुढील भाग दुसऱ्या बसच्या मध्यभागापर्यंत घासत गेला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. आमदार सुहास बाबर, विटा पोलीस, प्रशासन आणि एसटी महामंडळाचे अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने विट्यातील शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातामुळे रेवणसिद्ध घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास केला जात आहे. मृत आणि जखमी प्रवाशांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सारांश : सांगलीच्या खानापूर तालुक्यातील रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. प्राथमिक माहितीनुसार 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 15 ते 16 जण जखमी झाले आहेत. जखमींवर विट्यातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

Inline Article Ad 728x90