सयाजी शिंदेंचा लेकही गाजवणार मराठी सिनेसृष्टी! ‘या’ बहुचर्चित चित्रपटातून करणार पदार्पण; बाप-लेकाची जोडी पहिल्यांदाच एकत्र

मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका स्टारकिडची एन्ट्री होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ शिंदे ‘विष्णूबाळा’ या आगामी मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात वडील सयाजी शिंदे यांच्यासोबत काम करण्याची संधीही त्याला मिळाली आहे. सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट मराठीसह हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Sayaji-Shindes-Son

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नव्या पिढीतील कलाकारांची चर्चा रंगत असतानाच आणखी एका स्टारकिडच्या पदार्पणाची बातमी समोर आली आहे. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ शिंदे आता अभिनय क्षेत्रात नशीब आजमावणार आहे. विशेष म्हणजे, सिद्धार्थचा हा प्रवास थेट वडिलांसोबत सुरू होणार असून, दोघेही आगामी ‘विष्णूबाळा’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

वडिलांसोबतच अभिनयाचा श्रीगणेशा!

सिद्धार्थ शिंदे ‘विष्णूबाळा’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तो एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच अभिनय क्षेत्राची आवड निर्माण झाल्याचं सिद्धार्थने सांगितलं. या क्षेत्रात येण्यासाठी त्याने अभिनयाचं रीतसर प्रशिक्षणही घेतलं आहे.

आपल्या पदार्पणाविषयी बोलताना सिद्धार्थ म्हणाला की, अभिनयाची सुरुवात मराठी चित्रपटातून करायची, असं त्याने आधीच ठरवलं होतं. आता पहिल्याच चित्रपटात वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने हा अनुभव त्याच्यासाठी विशेष ठरला आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी मिळणं, ही आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याची भावना त्याने व्यक्त केली.

रक्तरंजित संघर्षाची कथा; सयाजी शिंदे साकारणार मध्यवर्ती भूमिका

‘विष्णूबाळा’ हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून, त्यात रक्तरंजित संघर्षाच्या नायकाची कथा मांडण्यात येणार आहे. या चित्रपटातील विष्णूबाळाची मध्यवर्ती भूमिका सयाजी शिंदे साकारणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच सिद्धार्थच्या पदार्पणाकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

दिग्दर्शनाची जबाबदारी अनुप जगदाळे यांच्याकडे

‘विष्णूबाळा’ या चित्रपटाची निर्मिती शिव समर्थ फिल्म प्रोडक्शन आणि सिनेमॅटिक सफारी फिल्म प्रोडक्शन या बॅनरखाली होत आहे. चित्रपटाचं लेखन अरविंद जगताप यांनी केलं असून, ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक अनुप जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. सचिन क्षीरसागर सहनिर्माते, तर आदित्य गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत.

मराठीपुरताच नाही, तर चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

‘विष्णूबाळा’ हा चित्रपट केवळ मराठी भाषेतच नव्हे, तर हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाला व्यापक प्रेक्षकवर्ग मिळण्याची शक्यता आहे. आता सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ शिंदे यांची पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना किती भावते आणि सिद्धार्थ आपल्या पहिल्याच भूमिकेत किती प्रभाव पाडतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Inline Article Ad 728x90