तामिळनाडूतील 52 मंदिरांमध्ये मोबाईल बॅन; सेल्फी-रील्सवरही बंदी!

तामिळनाडूतील 52 प्रमुख मंदिरांमध्ये स्मार्टफोन वापरावर बंदी लागू करण्यात आली आहे. भाविकांना प्रवेशापूर्वी मोबाईल जमा करावा लागणार असून, सेल्फी, रील्स आणि व्हिडिओ शूटिंगलाही मनाई आहे. विशेष म्हणजे, VIP आणि सेलिब्रिटींनाही या नियमातून सूट नाही. मंदिरांची पवित्रता आणि शांतता कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाईल बॅन

Ai generate

चेन्नई : तामिळनाडू सरकारने राज्यातील 52 प्रमुख मंदिरांमध्ये स्मार्टफोन वापरावर बंदी लागू केली आहे. मंदिराची पवित्रता आणि शांतता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल फोन जमा करावा लागणार आहे.

नवीन नियमानुसार, मंदिराच्या प्रवेशद्वारावर मोबाईल जमा करण्यासाठी स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक फोनसाठी 5 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, कॅमेरा नसलेले मोबाईल फोन मंदिरात नेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मंदिर परिसरात फोटो काढणे, सेल्फी घेणे, रील बनवणे आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. देवतांचे फोटो, धार्मिक विधी तसेच मंदिरातील इतर कार्यक्रमांचे चित्रीकरण करण्यासही परवानगी नसणार आहे.

विशेष म्हणजे, हा नियम VIP, सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध व्यक्तींनाही लागू असेल. मंदिर परिसरात त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासही मनाई करण्यात आली आहे. या निर्णयामागे मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाच्या 2 डिसेंबर 2022 रोजीच्या आदेशाचा आधार आहे. तिरुचेंदूर येथील अरुलमिगु सुब्रमण्य स्वामी मंदिरातील मोबाईल वापराबाबत दाखल जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मंदिरांमध्ये मोबाईल वापरावर निर्बंध घालण्याचे निर्देश दिले होते.

त्यानंतर हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागाने (HR&CE) संबंधित मंदिरांमध्ये नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. मंदिर परिसरात मोबाईल बंदीची माहिती देणारे फलक लावण्यासोबतच लाऊडस्पीकरद्वारे भाविकांना नियमांची माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मंदिर परिसरात वाढत असलेले सेल्फी, रील्स आणि व्हिडिओ शूटिंग यामुळे धार्मिक वातावरणावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे मंदिरांची पवित्रता, शिस्त आणि शांततापूर्ण वातावरण कायम ठेवणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे

Inline Article Ad 728x90