तिरुपतीला जाण्याची इच्छा; मद्यधुंद व्यक्तीने चोरली थेट RTC बस, २१ किमी चालवल्यानंतर अटक
हरियाणातील गुरुग्राम येथे पोलिस आणि गँगस्टर दीपक नांदल टोळीच्या शार्पशूटर्समध्ये झालेल्या चकमकीत चार आरोपी ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. या कारवाईत गुन्हे शाखेतील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच अत्याधुनिक पिस्तुले जप्त केली असून, दीपक नांदलच्या स्थानिक नेटवर्कचा शोध सुरू आहे
तेलंगणा: तिरुपतीला जाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका मद्यधुंद व्यक्तीने थेट बसच चोरल्याची धक्कादायक घटना तेलंगणातील जनगाव येथे घडली आहे. आरोपीने तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (TGSRTC) भाडेतत्त्वावरील रिकाम्या बसची चोरी करून ती तब्बल २१ किलोमीटर चालवली. अखेर सिंगराजुपल्ली टोल प्लाझाजवळ बसचा अपघात झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, वेंकन्ना हा पलाकुर्थी मंडलातील चेन्नूर गावातील ट्रॅक्टर चालक आहे. तो तिरुपतीला जाण्यासाठी प्रथम रेल्वे स्थानकावर गेला होता. मात्र, त्याला ट्रेन उपलब्ध न झाल्याने तो मद्यधुंद अवस्थेत जनगाव बसस्थानकात पोहोचला.
बसस्थानकात उभी असलेली TGSRTC ची भाडेतत्त्वावरील रिकामी बस पाहताच त्याने संधी साधली. बसमध्ये असलेली चावी अथवा टूलकिटचा वापर करून त्याने बस सुरू केली आणि तिरुपतीच्या दिशेने निघाला. काही वेळ बस कोणाच्याही लक्षात न येता रस्त्यावर धावत राहिली.
सुमारे २१ किलोमीटर प्रवास केल्यानंतर सिंगराजुपल्ली टोल प्लाझाजवळ आरोपीचे बसवरील नियंत्रण सुटले. बस वारंवार डिव्हायडरला धडकत होती. रिव्हर्स घेताना ती सिमेंटच्या बॅरियरवर आदळली. संशय आल्याने टोल कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले, बस जप्त केली आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सुदैवाने बसमध्ये कोणताही प्रवासी नसल्याने या घटनेत जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. या विचित्र प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.