अकोल्यात ‘मिठाई’चा मोठा खेळ उघड? FDA ने 1900 किलो साठा केला जप्त

दिवाळीपूर्वी FDA ने अकोल्यातील रायलीजिन परिसरात कारवाई करत दोन ट्रकमधून आलेला 1900 किलो मिठाईचा साठा जप्त केला. सुमारे 5.72 लाख रुपयांचा हा माल अस्वच्छ परिस्थितीत वाहतूक केला जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या तपासणीत समोर आले. संबंधित व्यापाऱ्यांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत.

Tukaram_Mundhe FDA

अकोला : दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. अकोल्यात करण्यात आलेल्या एका मोठ्या कारवाईत अहमदाबादहून आणण्यात आलेला सुमारे 1900 किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अकोल्यातील रायलीजिन परिसरातील Arco Transport येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास तपासणी केली. यावेळी गुजरातमधील अहमदाबादहून दोन ट्रकमधून आणण्यात आलेला विविध ब्रँडच्या मिठाईचा मोठा साठा आढळून आला.

या साठ्यात अंबिका स्वीट हलवा, GWAL ट्रॅडिशनल स्वीट, श्री ग्वाल हलवा, अंबिका रिच स्वीट, ब्रजनिधी स्वीट आणि मुरलीधर स्वीट यांसह विविध प्रकारच्या मिठाईचा समावेश होता.

तपासणीदरम्यान हा खाद्यसाठा अस्वच्छ आणि अनारोग्यदायी परिस्थितीत वाहतूक करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आणि उर्वरित सुमारे 1900 किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आला.

जप्त करण्यात आलेल्या मिठाईची एकूण किंमत अंदाजे 5 लाख 72 हजार रुपये असल्याची माहिती आहे. हा साठा अकोला महापालिकेच्या भोड येथील बायोगॅस प्रकल्पातील SWM Processing Plant येथे नष्ट करण्यात येणार आहे.

या प्रकरणात मिठाईचा माल मागवणारे व्यापारी कमल शर्मा, वैभव पाटील आणि अशोक अहुजा यांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि नियमांचे पालन याबाबत तपासणी मोहिमा अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असल्याने प्रशासनाकडून बाजारपेठेवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

Inline Article Ad 728x90