वर्षभर मुंबई पोलिसांना जमलं नाही, ते तुकाराम मुंढेंनी आठवडाभरात करून दाखवलं! पोलीस कॅन्टीनला ७५ हजारांचा दंड
मुंबई पोलिसांच्या नागपाडा येथील मोटार ट्रान्सपोर्ट विभागाच्या कॅन्टीनमधील अस्वच्छतेविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएने अवघ्या आठवडाभरात कॅन्टीन चालकाला ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

मुंबई : आपल्या शिस्तप्रिय आणि धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रमुख तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या मुंढे यांनी आता मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाच मोठा दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या नागपाडा येथील मोटार ट्रान्सपोर्ट विभागाच्या कॅन्टीनवर एफडीएने कारवाई करत चालकाला तब्बल ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
वर्षभर तक्रारी करूनही कारवाई नाही!
नागपाडा येथील पोलीस मोटार ट्रान्सपोर्ट विभागाच्या कॅन्टीनमधील अस्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत पोलीस कर्मचारी गेल्या वर्षभरापासून नाराजी व्यक्त करत होते. कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेच्या अभावाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याचे समोर आले आहे.
अखेर पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे धाव घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एफडीएने तातडीने दखल घेत कॅन्टीनमधील अस्वच्छतेप्रकरणी कारवाई केली. विशेष म्हणजे वर्षभर प्रलंबित असलेल्या या तक्रारीवर अवघ्या आठवडाभरात कारवाई झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
या घटनेनंतर मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्षभरात न सुटलेला प्रश्न तुकाराम मुंढे यांनी आठवडाभरात मार्गी लावल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भेसळयुक्त खाद्यतेलाविरोधातही धडक मोहीम
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधातील कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
दिवाळीच्या काळात मिठाई, फराळ आणि विविध खाद्यपदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाने आतापर्यंत खाद्यतेलासंदर्भात १,०८९ तपासण्या केल्या आहेत. या कारवाईत ८० परवाने रद्द करण्यात आले असून तब्बल २८,७५३ क्विंटल माल जप्त करण्यात आला आहे. भेसळयुक्त तेलाविरोधातील मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कालबाह्य अन्नपदार्थांबाबत कंपन्यांना कडक इशारा
अन्न व औषध प्रशासनाने कालबाह्य, खराब आणि नुकसानग्रस्त अन्नपदार्थांच्या विल्हेवाटीसंदर्भातही कठोर नियम लागू केले आहेत. काही ठिकाणी कालबाह्य झालेले अन्नपदार्थ पुन्हा वापरात आणले जात असल्याचे प्रकार समोर येतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने नवीन आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, कालबाह्य किंवा खराब झालेले अन्नपदार्थ नष्ट केल्याचा पुरावा संबंधित कंपन्यांना सादर करावा लागणार आहे. कंपनी लहान असो किंवा मोठी, नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
याशिवाय हॉटेल, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल आणि शालेय खाद्यपदार्थांसह विविध क्षेत्रांसाठी आतापर्यंत २२ नियमावली व आदेश जारी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तुकाराम मुंढेंच्या कारवाईची पुन्हा चर्चा
नागपाडा पोलीस कॅन्टीनवरील कारवाईमुळे शासकीय विभागांतील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सामान्य नागरिकांच्या अन्नसुरक्षेसोबतच पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबतही प्रशासनाने तितकेच सतर्क राहणे आवश्यक असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
वर्षभर प्रलंबित असलेल्या तक्रारीवर तातडीने कारवाई झाल्याने तुकाराम मुंढे यांच्या निर्णयक्षमतेची चर्चा होत असून, इतर शासकीय कॅन्टीनमधील स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या दर्जाचीही नियमित तपासणी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.