सुखबीर बादल यांच्यावर हल्ला; आरोपी अटकेत

नांदेडमधील तख्त श्री हजूर साहिब गुरुद्वारा परिसरात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून हल्ल्यामागील नेमका उद्देश तपासला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड पोलीस अधीक्षकांकडून घटनेची माहिती घेत बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

Sukhbir-Singh-Badal.avif

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे (SAD) प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमधील तख्त श्री हजूर साहिब गुरुद्वारा परिसरात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर बादल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सुखबीर सिंह बादल यांना एका इमारतीच्या दिशेने नेण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या उजव्या हाताला कापड बांधलेलेही दिसून येत आहे. सुखबीर सिंह बादल हे पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह तख्त श्री हजूर साहिब येथे गेले होते. याचवेळी गुरुद्वारा परिसरात त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे.

या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू असून आरोपीची चौकशी केली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून घटनेची माहिती घेतली. तसेच त्यांनी सुखबीर सिंह बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बादल यांची प्रकृती चांगली आणि स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हल्ल्याचा उद्देश आणि त्यामागील कारणांचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनीही या घटनेची माहिती घेतली आहे. त्यांनी सांगितले की, नांदेडमधील गुरुद्वारा परिसरात सुखबीर सिंह बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत संपूर्ण माहिती घेतली जाईल. घटनेची चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, हल्ल्याचे नेमके कारण काय आणि आरोपीचा या घटनेमागील उद्देश काय होता, याचा तपास नांदेड पोलीस करत आहेत.

Inline Article Ad 728x90