केरळच्या वायनाड बोगद्याजवळ भीषण दरड कोसळली; ३ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू, काही बेपत्ता

केरळच्या वायनाड जिल्ह्यातील कल्लाडी परिसरात बोगद्याच्या कामाजवळ दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. आतापर्यंत ३ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाला असून काहीजण बेपत्ता आहेत, तर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

vaynad

केरळ : वायनाड बोगद्याजवळ दरड कोसळून भीषण अपघात झाला आहे. मुसळधार पावसामुळे मंगळवार, ७ जुलै रोजी ही घटना घडली. ही दुर्घटना केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडीजवळील कल्लाडी येथील ‘मीनाक्षी पुला’जवळ घडल्याचे समजते आहे.

आतापर्यंत ३ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. हे कामगार मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील असल्याचे सांगितले जात आहे. काही कामगार बेपत्ता असून ५ ते ७ कामगार ढिगाऱ्याखाली असल्याचा अंदाज आहे. १० कामगारांना ढिगाऱ्यातून जिवंत काढून मेप्पाडी येथील WIMS मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटनेच्या वेळी घटनास्थळी बोगद्याचे काम करणारे मजूर, सुपरवायझर आणि सुरक्षा रक्षक असे एकूण सुमारे १८ लोक उपस्थित होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांनुसार, डोंगर खचताच माती आणि दगडांचा प्रचंड लोंढा खाली आला. यामध्ये एक इंधन टँकर, एक बस आणि कामगारांची अनेक वाहने पाण्याच्या वेगाने वाहून गेली. रस्त्यावरून जाणारे पादचारी थोडक्यात बचावले.

दरडीच्या ढिगाऱ्याखाली कामगारांच्या तात्पुरत्या शेड पूर्णपणे गाडल्या गेल्या. तसेच शेजारील काही होमस्टे आणि घरांचेही मोठे नुकसान झाले. वायनाड परिसरात गेल्या २४ तासांत २६५ मिमीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस पडला होता आणि प्रशासनाने रेड अलर्टही जारी केला होता.

विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन आणि कृषी मंत्री टी. सिद्दीकी यांनी या दुर्घटनेला नैसर्गिक आपत्ती न म्हणता ‘मानवनिर्मित आपत्ती’ म्हटले आहे. बोगद्याचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीने बोगदा खणताना निघालेली हजारो टन माती आणि खडी कल्लाडी येथे डोंगरउतारावर अत्यंत असुरक्षितपणे रचून ठेवली होती, असा आरोप करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २० जून रोजीच कंत्राटदाराला ही माती तातडीने हटवण्याचे कायदेशीर आदेश दिले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

मुसळधार पावसामुळे ही साठवून ठेवलेली माती भुसभुशीत झाली आणि तिचा संपूर्ण ढिगारा रस्त्यावर आणि कामगारांवर कोसळला. अधिकृत मदत पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांनी चिखलात उतरून २ ते ३ कामगारांना सुखरूप बाहेर काढले. सध्या ३० जणांची तुकडी, स्थानिक अग्निशमन दल आणि क्रेनच्या साहाय्याने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

keral

कंत्राटदार कंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी या गंभीर दुर्घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. ही दुर्घटना केरळमध्ये अत्यंत संवेदनशील मानली जात आहे, कारण जुलै २०२४ मध्ये वायनाडमधील मुंडक्काई आणि चूरलमाला येथे झालेल्या भीषण भूस्खलनाला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत; त्या दुर्घटनेत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. पश्चिम घाटासारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून केल्या जाणाऱ्या बोगद्यांच्या कामांमुळे निसर्गाचा कोप होत असल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञ करत आहेत.

Inline Article Ad 728x90